औरंगाबाद : ट्रकने चिरडल्याने वाहतूक पोलिसाचा जागीच मृत्यू
औरंगाबाद, दि. 27, मार्च - कर्तव्यावर असलेल्या एका वाहतूक पोलिसाला ट्रकने चिरडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत वाहतूक पोलिसाचा जागीच मृत्यू झाला आहे. धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर चाळीसगाव जवळ कन्नड घाटात ही घटना घडली. अनिल शिसोदे असे मृत वाहतूक पोलिसाचे नाव आहे. शिसोदे हे गेल्या तीन वर्षापासून चाळीसगाव वाहतूक शाखेत कार्यरत होते. आज सोमवारी ते महामार्ग पोलीस चौकीच्या समोर कर्तव्य बजावत असताना धुळे येथून औरंगाबादकडे जाणा-या ट्रकला त्यांनी थांबण्याचा इशारा केला. मात्र, त्यांना चिरडून ट्रकचालक फरार झाला. ट्रकचालकाचा पोलीस शोध घेत आहेत.