जळगाव जिल्ह्यात 1 एप्रिलपासून स्वस्त धान्य बायोमेट्रीक पद्धतीने !
जळगाव, दि. 27, मार्च - सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत 1 एप्रिलपासून जळगाव जिल्ह्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानातून शिधापत्रिका धारकांची बायोमेट्रीक पध्दतीने तपासणी करुनच संबधीतांना धान्य वितरण केले जाणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी राहुल जाधव यांनी दिली आहे. जिल्हास्तरीय दक्षता समितीची बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली आज संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते. जाधव म्हणाले, जिल्ह्यातील ज्या शिधापत्रिका आधार संलग्न केल्या आहेत. अशा शिधापत्रिका धारकांस बायोमेट्रीक पध्दतीचा अवलंब करुन स्वस्त धान्य दूकानातून धान्य व इतर वस्तू वितरीत के ल्या जाणार असून यामुळे गैरप्रकारांना आळा असेल. बायोमेट्रीक पध्दत सुरु करण्यासाठी जिल्हास्तरावर लवकरच एक कार्यशाळा आयोजित केली जाणार असून यामध्ये ही पध्दत कशी वापरावयाची याचे सर्व संबंधितांना प्रशिक्षण दिले जाणार असल्याचेही जाधव यांनी बैठकीच्या शेवटी सांगितले.