नेमतवाडीच्या शेतकर्यांनी दिला आत्मदहनाचा इशारा
सोलापूर, दि. 19, मार्च - नेमतवाडी (ता. पंढरपूर) येथील काही जणांनी अॅट्रॉसिटी कायद्याखाली गुन्हा दाखल करण्याची धमकी देत येथील तीन शेतकर्यांच्या सुमारे आठ ते दहा एकर उसाची तोडणी थांबवली आहे. या प्रकारामुळे येथील शेतकरी त्रिभुवन व्यंकटेश पाटील, आदिनाथ भानुदास गायकवाड, बाळासाहेब भानुदास गायकवाड यांचा ऊस शेतात वाळला असून, लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या बाबत तिन्ही शेतकर्यांनी करकंब पोलिस ठाण्यात तक्रार करूनही पोलिसांनी कोणतीच दखल घेतली नसल्याने त्यांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. या जमिनी संदर्भात कोर्टात दावा चालू आहे. परंतु यापूर्वी पीक लागणीस व काढणीस न्यायालयाने कोणताही आदेश दिलेला नाही, असे असतानाही संबंधितांनी अॅट्रॉसिटी कायद्याचा धाक दाखवून ऊस तोडणीस विरोध केला आहे. ऊस तोडणीसाठी पोलिस संरक्षण मिळण्याची मागणीदेखील या शेतकर्यांनी तहसीलदारांकडे केली होती. त्यावेळी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची पोलिसांनी खबरदारी घ्यावी, असे पत्र तहसीलदारांनी करकंब पोलिसांना दिले आहे.