Breaking News

देशातील नक्षलवाद अंताच्या दिशेने : राजनाथ सिंह


गुडगाव/वृत्तसंस्था : देशातील नक्षलवादाचे कडवे आव्हान आता शेवटच्या टप्प्यात पोहोचले आहे. थेट लढत देण्याचे बळ नसल्यामुळे नक्षलवादी सुरक्षा दलांवर भ्याड हल्ले करत आहेत, अशी प्रतिक्रिया केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केली आहे. नक्षलविरोधी कारवायांमध्ये अग्रणी असलेल्या केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) 79 व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात राजनाथसिंह बोलत होते. आपल्या भाषणात राजनाथ यांनी सुकमा येथील चकमकीत शहीद झालेल्या 9 जवानांना श्रद्धांजली अर्पण के ली. नक्षलवाद हे मोठे आव्हान बनले आहे. परंतु सीआरपीएफ व इतर सैन्याचा निर्धार व शौर्य यामुळे अशा प्रकारच्या घटनांचे प्रमाण कमी झाले आहे. यापूर्वी चकमकीच्या दरम्यान सुरक्षा रक्षकांना अधिक हानी पोहोचत होती व नक्षलवाद्यांना होणार्‍या हानीचे प्रमाण कमी असायचे. आता मात्र हे चित्र पालटले आहे, असे राजनाथ यांनी सांगितले. 
यावेळी सीआरपीएफ कमांडंट चेतन चीता यांचे राजनाथ यांनी विशेष कौतुक केले. चीता यांनी मागील वर्षी काश्मीर खोर्‍यात झालेल्या एका कारवाईत नऊ गोळ्यांचा वार सहन क रून शत्रूचा सामना करण्यात असामान्य धैर्य व बुद्धिमत्तेचे प्रदर्शन केले. चीता नुकतेच सेनेच्या दिल्ली मुख्यालयात रुजू झाले आहेत. सैन्यातील जवानांना देण्यात येणार्‍या सुविधां विषयी बोलताना राहण्याच्या सोयीसाठी भविष्यात अधिक पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येतील, असे राजनाथ सिंह यांनी सांगितले. एकूण 3.18 लाख कर्मचार्‍यांचे बळ असलेल्या सीआरपीएफची स्थापना 1939 मध्ये झाली होती.