Breaking News

लालू प्रसाद यादवांना 14 वर्षांचा कारावास

रांची : चारा घोटाळ्यातील चौथ्या प्रकरणात बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांना न्यायालयाने चौदा वर्षांच्या कारावास आणि 60 लाख रूपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. दोन कलमांखाली न्यायालयाने प्रत्येकी सात वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे लालू प्रसाद यादव यांना शिक्षा एकामागोमाग एक अशी भोगावी लागणार आहे.

दुमका कोषागारातून अवैधरीत्या पैसे काढल्याप्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने लालू प्रसाद यांच्यासह 19 जणांना दोषी ठरवले होते. सीबीआयच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश शिवपाल सिंह यांच्यासमोर प्रकरणाची सुनावणी झाली. लालूंच्या व्यतिरीक्त अन्य 18 दोषींना साडेतीन वर्ष तुरूंगवास आणि 15 लाख रूपये दंडाची शिक्षा सुनावली. 
लालू यादव यांना दोन कलमांतर्गत शिक्षा सुनावण्यात आली. दोन्ही कलमांतर्गत लालू यादव यांना प्रत्येकी 7 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आणि दोन्ही शिक्षा वेगवेगळ्या भोगायच्या आहेत. याशिवाय लालू यादवांवर भ्रष्टाचार विरोधी कायद्याअंतर्गतही कारवाई करण्यात आली. रांचीच्या स्पेशल सीबीआय कोर्टानं लालू यादव यांना दोषी घो षित केलं.यापूर्वीच्या तीन खटल्यात सुनावलेल्या शिक्षा एकाचवेळी भोगायच्या आहेत. मात्र चौथ्या खटल्यातील शिक्षा वेगवेगळ्या भोगायच्या आहेत. शिवाय दंडाची रक्कमही वेगवेगळी म्हणजेच 30-30 लाख अर्थात 60 लाख रुपये आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आज शिक्षेची सुनावणी करण्यात आली. मात्र लालू सध्या रांचीच्या रिम्स रुग्णालयात उपचार घेत असल्याने, ते या सुनावणीला हजर नव्हते. त्यांना लवकरच दिल्लीतील एम्स रुग्णालयात हलवण्यात येणार आहे.