Breaking News

साईनाथ रुग्णालयाची मान्यता रद्द


शहरातील निवासी क्षेत्रात सुरु असलेल्या ‘साईनाथ रुग्णालया’ची मान्यता रद्द झाली आहे. नागरिकांच्या सतर्कतेमुळे जिल्हा शल्य चिकित्सकांनी ही कारवाई केली. यामुळे येथील वैद्यकीय क्षेत्र हादरले आहे. संगमनेरातील ही पहिलीच कारवाई असून निवासी भागात रुग्णालये चालविण्याऱ्यांसमोर आता नवे संकट उभे राहिले आहे.

दरम्यान, ज्याप्रमाणे ‘बॉम्बे नर्सिंग होम अॅक्ट’ व शासनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी साईनाथ रुग्णालयाची मान्यता रद्द केली गेली. अशाच प्रकारे संगमनेर शहरातील नवीन नगर रोड भागात असलेल्या अनियमित रुग्णालयावर देखील जिल्हा शल्यचिकित्सक व वैद्यकीय अधिकारी कारवाई करतील का, असा सवाल या कारवाईच्या निमित्ताने उपस्थित होत आहे. नियमाचे उल्लंघन करत असलेल्या या आणि अन्य रुग्णालयांवर अधिकारी मेहेरबान कसे, हा खरा प्रश्न आहे. 

‘बॉम्बे नर्सिंग होम अॅक्ट’चे उल्लंघन करणारे हे हॉस्पिटल जाणता राजा मैदानाकडे जातांना एका निवासी इमारतीत अलीकडेच सुरु करण्यात आले होते. या रुग्णालयाला सुरुवातीपासूनच स्थानिक नागरिकांनी विरोध केला होता. स्थानिक वैद्यकीय अधिकाऱ्यांनीदेखील नागरिकांच्या तक्रारीकडे सातत्याने दुर्लक्ष केले होते. विजयकुमार फुलचंद कटारीया यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत जिल्हा शल्य चिकीत्सक बापूसाहेब गाडे यांनी यासाठी द्विसदस्यीय चौकशी समिती नेमली होती. या समितीच्या चौकशी अहवालात २५ बेडचे हॉस्पिटल नियम उल्लंघन करणारे आणि सादर नकाशा डावलून करण्यात आल्याचे समोर आले होते. त्यातच हे रुग्णालय निवासी क्षेत्रातदेखील असल्याचे पुढे आले. त्यामुळे या रुग्णालयाची मान्यता रद्द करण्यात आली. शासनाच्या अटी व शर्तींचा भंग केल्याच्या कारणावरुन डॉ. अमोल कर्पे यांच्या साईनाथ रुग्णालयाला निर्गमित केलेले प्रमाणपत्र जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बापुसाहेब गाडे यांनी रद्द केले. यानंतरही हे रुग्णालय सुरुच राहिले तर नियमानुसार कारवाई केली जाणार असल्याचे संगमनेर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजीव घोडके यांनी सांगितले.