Breaking News

ग्रामविकास मंत्र्यांच्या साखर कारखान्याचे दहा दिवसांसाठी निलंबन

बीड : परळी तालुक्यातील पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यातील ऊसाच्या गरम रसाच्या टाकीचा स्फोट होवून 11 जणांना जीव गमवावा लागला होता. या घटनेबाबत कारखाना प्रशासनाकडून योग्य ती दखल घेतली नसल्याचा ठपका अन्न प्रशासनाच्या गुप्त वार्ता विभागाने ठेवला होता. कारखान्यात असलेल्या बर्‍याच त्रुटींबाबत सुधारणा नोटीस देखील काढली होती. मात्र, 3 महिन्यानंतरही कारखान्यात कसलाच बदल केला नसल्याने, अन्न प्रशासन विभागाने वैद्यनाथ कारखान्याचे दहा दिवस निलंबन केले आहे. वैद्यनाथ कारखान्याच्या अध्यक्षा ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आहेत.


परिसरातील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळावा म्हणून माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांनी वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली होती. कारखाना झाल्यानंतर अनेक बेरोजगारांच्या हाताला काम मिळाले. तब्बल 18 वर्षापासून वैद्यनाथ कारखाना अविरत सुरू राहिला. मात्र, कारखान्याच्या तांत्रिक विभागाने यंत्र सामुग्रीकडे कधी जातीने लक्ष दिलेच नाही. त्यामुळेच रसाची टाकी फुटून तब्बल 11 जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर याचे राज्यभर पडसाद उमटले. अनेक यंत्रणांकडून तपास करण्यात आला. याचवेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी कारखान्याला भेट देवून घटनास्थळाची पाहणी करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना पोलिसांनी आडवले होते.