Breaking News

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राहुल गांधींनी घेतली शरद पवारांची भेट


नवी दिल्ली : 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. उत्तर प्रदेश आणि बिहारमधील पोटनिवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाची कामगिरी खराब झाली असतानाच पवार आणि गांधी यांची भेट झाली आहे. गोरखपूर आणि फुलपूर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपच्या पराभवानंतर काही तासांतच शरद पवार यांची गांधी यांनी भेट घेतली. ही बैठक पवार यांच्या निवासस्थानी झाली, अशी माहिती सूत्रांनी दिली. भाजपला रोखण्यासाठी क ाँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याबाबत या बैठकीमध्ये चर्चा झाली. राहुल गांधी लवकरच पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचीही भेट घेणार आहेत. शरद पवार यांनी आयोजित केलेल्या 28 मार्चच्या विरोधी पक्ष बैठकीलासुद्धा बॅनर्जी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. बुधवारी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपला पराभव पत्कारावा लागला. त्यामुळे सर्व विरोधी पक्षांसाठी एक व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.