Breaking News

खोदा मंत्रालय निकला चुहाँ! : धनंजय मुंडे

भ्रष्टाचारी मंत्री आणि अधिकार्‍यांना क्लीन चीट देता देता एक दिवस मुख्यमंत्री या भ्रष्टाचाराच्या गुगलीने क्लिन बोल्ड होतील अशा शब्दात विधान परिषदचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मंत्रालयातील उंदीर घोटाळ्याचे धारधार शब्दांनी विच्छेदन केले. मृत माणसाच्या नावाचा वापर करून धनादेश देणारे सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंता तसेच आयकरच्या नोटीसीने त्यांच्या कुटूंबियांना छळण्यास कारणीभूत ठरलेल्या कुट प्रवृत्तींविरूध्द राग व्यक्त करून फौजदारी दाखल करण्याऐवजी सरकार आमच्यावर राग का काढते असा सवाल ना.मुंडे यांनी केला.



गेल्या आठवडाभरापासून मंत्रालयातील उंदीर घोटाळ्याने महाराष्ट्र सरकारची झोप उडाली आहे. आ. चरणभाऊ वाघमारे आणि माहिती अधिकार कार्यकर्ते खरे यांनी माहितीच्या अधिकारातून माहिती काढून हा उंदीर घोटाळा उजेडात आणला होता. या माहितीवरून दि. 6 फेब्रूवारी 2018 रोजी आ. चरणभाऊ वाघमारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या घोटाळ्याची तक्रार केली होती. याच कागदपत्रांच्या आधारे आ. एकनाथ खडसे यांनीही कनिष्ठ सभागृहात हा मुद्दा उपस्थित करून मेलेल्या उंदरांचा घोटाळा जिवंत करण्याचा प्रयत्न केला होता.
मंगळवारी वरिष्ठ सभागृहाचे विरोधी पक्षनेते ना. धनंजय मुंडे यांनी मात्र उंदीर घोटाळ्याचे विच्छेदन करतांना धारधार शब्दांनी सरकारसह शहर इलाखा साबां विभागाच्या तत्कालीन कार्यकारी अभियंता प्रज्ञा वाळके आणि त्यांच्या सह अभियंत्यांच्या कार्यशैलीचे वाभाडे काढले. मंत्रालयातील उंदीर मारण्याचे कंत्राट शहर इलाखा साबांच्या कार्यकारी अभियंता प्रज्ञा वाळके यांनी ज्या विनायक मजूर सह. संस्थेला दिला त्या संस्थेचा मालक संचालक मयत आहे. त्याच्या नावावर लाखो रूपयांचे धनादेश शहर इलाखा साबांने काढले. इतकेच नाहीच तरा साबांला सादर असलेल्या कागदपत्रांवर तसेच इन्कम टॅक्सशी संबंधित कागदपत्रांवर देखील त्या मयत इसमाच्या सह्या आहेत ही अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे. त्याहून मोठा निर्लज्जपणा म्हणजे हे सारे मंत्रालयाच्या आवारात घडले आहे.
या संदर्भात विस्तृत विवेचन करतांना ना.मुंडे यांनी तीन लाख एकोणावीस हजार चारशे गोळ्या मंत्रालयाच्या प्रत्येक मजल्यावर विभागून ठेवल्या गेल्या. त्याचे परिमाण एक बाय एक असे आहे. मा दहा ग्रम वजन असलेल्या या गोळ्या या काळात मंत्रालयात फिरतांना कधीच पायात घुटमळल्या नाहीत. यावरून या गोळ्यांचे अर्थकारण काय आहे हे स्पष्ट होते. हे सारे घडत असतांना दोषींवर मंत्र्यांनी राग व्यक्त करून कारवाई करणे अपेक्षित आहे. मात्र मंत्री आमच्यासारख्यांवर राग व्यक्त करतात. अशा पध्दतीने भ्रष्टाचार संपणार नाही. मुख्यमंत्र्यांनी भ्रष्टाचाराची दखल घेऊन मंत्री आणि अधिकार्‍यांना क्लीन चीट देण्याचे पुण्य थांबवावे अन्यथा हा भ्रष्टाचार मुख्यमंत्र्यांचा क्लीनबोल्ड करील असा इशारा देऊन ना. धनंजय मुंडे यांनी उंदीर घोटाळ्यात सहभागी असलेल्या सर्व संबंधितांवर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली.

दादा! स्वतःला वाचवा
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भ्रष्टाचाराचे बाभाडे जाहीरपणे काढले जात असतांना भ्रष्ट अभियंत्यांना दादा का वाचवितात ? असा आश्‍चर्यमिश्रीत सवाल विचारला जात आहे. साबांतील भ्रष्ट जातकुळीने छगन भुजबळ यांचे राजकीय जीवन देशोधडीला लावले. हा अध्याय नजरेसमोर ठेवून दादांनी वाटचाल करावी. कारण भुजबळांची वाट लावणारी लॉबीच आजही षडयंत्रात कार्यरत आहे. अशा गर्भीत इशारा साबांच्या एका लॉबीकडून दिला जात आहे.