Breaking News

हिरवाई निर्माण करण्यासाठी नागरिकांनाही सहभागी करण्याचा मनपाचा प्रयत्न - महापौर

नवी मुंबई, दि. 20, मार्च - आधुनिक शहर म्हणून नावाजली जाणारी नवी मुंबई स्वच्छ शहराच्या मानांकनाप्रमाणेच पर्यावरणशील शहर म्हणून ओळखली जावी यादृष्टीने शहरात जास्तीत जास्त हिरवाई निर्माण करण्याचा व त्यामध्ये नागरिकांनाही सहभागी करण्याचा महानगरपालिकेचा सातत्याने प्रयत्न असल्याचे मत महापौर जयवंत सुतार यांनी व्यक्त करीत आगामी अर्थसंकल्पात पर्यावरणपुरक शहर निर्मितीसाठी विविध उपक्रम राबविण्याबाबत भर देण्यात येत आहे असे सांगितले.


नवी मुंबई महानगरपालिका वृक्ष प्राधिकरणाच्या वतीने से.19, नेरूळ येथील वंडर्स पार्कमध्ये आयोजित केलेल्या झाडे, फुले, फळे, भाजीपाला प्रदर्शन व उद्यान स्पर्धा पारितोषिक वितरण सोहळ्याप्रसंगी ते आपले मनोगत व्यक्त करीत होते.याप्रसंगी बोलताना महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी पर्यावरण संरक्षण व संवर्धन ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे हे सांगत पर्यावरणशीलतेचा संदेश नागरिकांपर्यंत पोहचावा याक रीता आयोजित प्रदर्शनाला असंख्य नागरिकांनी भेट देत प्रदर्शन यशस्वी केल्याबद्दल समाधान व्यक्त केले. अनेक पालकांनी आपल्या मुलांसह व शाळांनी विद्यार्थ्यांना येथे आणून त्यांच्या मनात पर्यावरणाविषयी आपुलकी निर्माण केल्याबद्दल त्यांनी जागरूक पालक, शिक्षकांचे अभिनंदन केले. शून्य कचरा संकल्पनेविषयी बोलताना नागरिकांनी आपला ओला कचरा घरातल्या घरातच खतात रुपांतर करून त्यामधूनच किचन गार्डन किंवा टेरेस गार्डन फुलवावे व कमीत कमी कचरा महानगरपालिकेच्या घनकचरा प्रकल्पस्थळी जाईल याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे असे आवाहन आयुक्तांनी के ले. महाराष्ट्र राज्यात आजपासून प्लास्टिक बंदी लागू झाली असून नागरिकांनी प्लास्टिकचा वापर टाळला पाहिजे असे ते म्हणाले.
सभागृह नेते रविंद्र इथापे यांनी वंडर्स पार्क ही निसर्गरम्य व नागरिकांसाठी सोईची जागा असून कुटुंबियांसमवेत याठिकाणी विरंगुळाही मिळतो असे सांगत यावर्षी प्रदर्शन आयोजनाला काहीसा उशीर होऊनही व आज गुढीपाडव्याचा सण असूनही नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला.
एकूण 24 वेगवेगळ्या विभागात, वेगवेगळ्या वयोगटांसाठी आयोजित करण्यात आलेल्या झाडे, पाने, फुले, फळे, भाजीपाला व उद्यान या स्पर्धांना उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला असून अधिकाधिक स्पर्धांमध्ये विजेतेपद मिळवित मध्य रेल्वे छत्रपती शिवाजी टर्मिनल मुंबई यांनी प्रदर्शनातील सर्वोत्कृष्ट सन्मानचिन्ह प्राप्त केले. रिलायन्स कम्युनिकेशन यांनी व्दितीय तसेच रिलायन्स कार्पोरेट आयटीपार्क लि. यांनी तृतीय क्रमांकाचे सन्मानचिन्ह संपादन केले.
उद्यान विभागाचे उप आयुक्त तुषार पवार यांनी सोशल मिडियात गुंतलेली नवी पिढी या प्रदर्शनाच्या माध्यमातून झाडा - फुलांकडे आकर्षित झाल्याचे चित्र पहायला मिळाले याबद्दल प्रास्ताविकपर मनोगतात समाधान व्यक्त करीत तीन दिवसात एक लाखाहून अधिक नागरिकांनी प्रदर्शनाला भेट देवून हा उपक्रम यशस्वी केल्याबद्दल आभार मानले.