Breaking News

मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविण्याचा निर्धार अण्णा हजारे यांच्या उपोषणाचे पडसाद

अहमदनगर : विविध मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शुक्रवारी दिल्लीतील रामलीला मैदानावर उपोषण सुरू केल्यानंतर नगर जिल्ह्यात राळेगणसिध्दी सहीत अनेक गावांमध्ये हजारेंच्या समर्थनासाठी उत्स्फूर्त आंदोलने करण्यात येत आहेत. राळेगणसिध्दीमध्ये ग्रामस्थांनी धरणे आंदोलन व साखळी उपोषण सुरू केले आहे. रविवारी(25 मार्च) राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एका कार्यक्रमासाठी नगर जिल्ह्यात येणार असून यावेळी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविण्याचा निर्धार ग्रामस्थांनी एकमताने घेतला आहे.
अण्णा हजारे यांच्या प्रत्येक आंदोलनात राळेगणसिध्दीच्या ग्रामस्थांची भूमिका नेहमीच महत्वाची राहिली आहे. त्यामुळेच हजारे यांनी शुक्रवारी दिल्लीत आंदोलन सुरू केल्यानंतर गावातील लोकांनी उस्फूुर्तपणे आपले सर्व व्यवहार बंद ठेवून गावामध्ये आंदोलन सुरू केले आहे. शुक्रवारी रात्री गावात काढण्यात आलेल्या कँडल मार्च मध्ये अख्खा गाव सहभागी झाला होता. यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा देखील देण्यात आल्या. केंद्र सरकार ने दिल्लीत हजारे यांच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी जाणा-या आंदोलकांच्या रेल्वे गाड्या,बसेस व अन्य वाहने रोखल्याच्या निषेधार्थ गावातील लोकांनी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. तसेच अहिंसक पध्दतीने आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. रविवारी(25 मार्च)राज्याचे मुख्यमंत्री नगर जिल्ह्यातील पाथर्डी येथे एका कार्यक्रमासाठी येणार आहेत.त्यावेळी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविण्याचा निर्णय उपसरपंच लाभेश औटी यांनी जाहीर केला.तसेच शिरूर-पारनेर या रस्त्यावर रस्ता रोको आंदोन करण्याचे जाहीर करण्यात आले.दरम्यान शुक्रवारी रात्री अण्णा हजारे यांनी मोबाईल वरून राळेगण सिध्दी च्या ग्रामस्थांशी संवाद साधून गावातील आंदोलनाबाबत माहिती घेतली.नगर शहरात स्वयंसेवी संस्थांच्या महासंघाच्या वतीने हजारे यांच्या समर्थनार्थ आंदोलन करण्यात आले. तसेच जिल्ह्यातील नेवासा,जामखेड आदि शहरांसहीत बहुतेक गावांमध्ये हजारे यांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांनी आंदोलने केली आहेत.