Breaking News

सातार्‍यात झेडपी चौकातील गटर दुरुस्ती; पालिकेचे आजी-माजी पदाधिकारी रस्त्यावर

सातारा,  (प्रतिनिधी) : गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने झेडपीजवळील चौकात गटर तुंबत असल्यामुळे ओव्हरफ्लो होऊन पाणी रस्त्यावर यायचे आणि त्यामुळे दुर्गंधी निर्माण व्हायची. शिवाय वाहतुकीचा प्रश्‍न निर्माण होत होता. जवळच सर्किट हाऊस असल्याने मंत्री, खासदार-आमदार व अधिकार्‍यांची ये-जा याच चौकातून होते. त्यामुळे हा चौक सातारा शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. या चौकाची योग्यप्रकारे काळजी सार्वजनिक बांधकाम विभागाने घ्यायला हवी होती. ती न घेतल्याने सातारकरांना याचा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे याठिकाणी कायमस्वरुपी उपाययोजना करण्यासाठी सातारा नगरपरिषदेने ठोस पाऊल उचलले आहे.
शुक्रवारी उपनगराध्यक्ष सुहास आबासाहेब राजेशिर्के स्वतः प्रत्यक्ष गटारामध्ये उतरुन पाहणी केली. यावेळी पक्षप्रतोद माजी नगराध्यक्ष निशांत पाटील, स्थायी समिती सदस्य अ‍ॅड. डी. जी. बनकर, आरोग्य सभापती यशोधन नारकर, मुख्य कार्यकारी अधिकारी शंकर गोरे, नगरपरिषदेचे अभियंता पाटील, साबळे, आरोग्य निरीक्षक कायगुडे, रणदिवे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. 

प्रत्यक्ष कामकाजास सुरवात केल्यानंतर गटारामध्ये एमएसईबीची 22 केव्हीची विद्युत लाईन असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे काम थांबावावे लागले. विद्युत पुरवठा बंद करुन सदरचे काम पूर्णत्वास न्यावे लागणार आहे. अचानक विद्युत पुरवठा बंद केल्यास झेडपीसह त्या परिसरातील महत्वाची कार्यालये व रुग्णालयावर परिणाम होईल. त्यामुळे पूर्व कल्पना देऊनच हे काम करण्याचा निर्णय नगरपरिषदेने घेतला. मंगळवार 27 मार्च रोजी एमएसईबीच्या सहकार्याने सकाळी 8 वाजता या कामास सुरुवात करुन संध्याकाळी 5 वाजेपर्यंत काम पूर्ण करण्यात येईल. यादरम्यान दिवसभर या भागातील विद्युत पुरवठा खंडित करण्यात येणार आहे.
सातारा-कोरेगाव हा रस्ता वर्दळीचा मार्ग आहे. या मार्गावर जिल्हा परिषद, जिल्हा मध्यवर्ती बँक तसेच विविध हॉस्पिटल्स आणि सर्किट हाऊस असल्याने या चौकात सतत गर्दी असते. या चौकातच रस्त्याखालून गटर आहे. परंतु या भागात अलीकडच्या काही वर्षात सांडपाण्याची व्यवस्था योग्यपणे होण्यासाठी तेवढया क्षमतेचे गटर तयार करणे अथवा मोठ्या व्यासाच्या पाईप बसवणे आवश्यक आहे. सध्या असणारे गटर हे अपुरे पडत आहे. त्यातच घनकचरा मोठ्या प्रमाणावर येत असल्याने गटर ब्लॉक होऊन महत्वाचा असणारा चौक दुर्गंधीयुक्त बनतोय. अधूनमधून तेवढ्या पुरती दुरुस्ती होत आहे. मात्र या दुरुस्तीचा उपयोग होत नाही. त्यामुळे कायमस्वरुपी याठिकाणी काय उपाययोजना करता येईल यासाठी नगरपरिषदेची यंत्रणा सज्ज झाली आहे.
नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ नये. वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये आणि ऐतिहासिक शहरात येणार्‍या मंत्र्यांचे, खासदारांचे, आमदारांचे, व्हीआयपी अधिकार्‍यांचे स्वागत या चौकातील दुर्गंधीने होऊ नये या भूमिकेतून स्वतःच नगरपरिषदेने लोकभावनेचा व लोकहिताचा विचार करुन गटर दुरुस्ती कामाला प्राधान्य दिले आहे. पोकलॅन, जेसीबीच्या सहाय्याने हे काम वेगाने पूर्ण केले जाईल. यासाठी नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाने कंबर कसली. संबंधित अधिकार्‍यांना उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांनी सूचना केल्या. शुक्रवारी सकाळी या परिसरातील विद्युत पुरवठा बंद करुन कामकाज पूर्ण करावे असा आग्रह धरला जात होता. तथापि अचानक विद्युतपुरवठा खंडित करणे अयोग्य असल्याने हे काम मंगळवारी पूर्ण करण्यात येणार आहे.