Breaking News

अंगणवाडी सेविकांचे निवृत्तीचे वय 65 वर्षेच ठेवणार - पंकजा मुंडे

मुंबई, दि. 20, मार्च - अंगणवाडी सेविकांचे निवृत्तीचे वय 65 वर्षेच ठेवण्याचा पूर्वीचा निर्णय कायम ठेवण्यात आला आहे, अशी माहिती ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी विधानसभेत दिली.
त्यांनी पुढे माहिती दिली की, अंगणवाडी सेविकांचे मानधन4 हजार रुपयांवरून 6 हजार 500 रुपये करण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला. त्याचवेळी अंगणवाडी सेविकांचे सेवा निवृत्तीचे वय65 वर्षांवरून 60 वर्षे करण्याचा निर्णय घेतला होता. 

त्यामागे 60वर्षे वयानंतर महिलांच्या शारीरिक तक्रारी, क्षमतांमध्ये होणारी घट यामुळे अंगणवाडीच्या बालकांच्या शिक्षणावर होणारा परिणाम विचारात घेण्यात आला होता. मात्र, सेवानिवृत्तीच्या वयाच्या निर्णयावर अनेक संघटनांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे विविध संघटनांशी शासनाने चर्चा करून सेवानिवृत्तीचे वय पूर्वीप्रमाणेच 65वर्षे करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, हे करताना 60 वर्षांनंतर अंगणवाडी सेविकांच्या शारिरीक योग्यतेची वैद्यकीय तपासणी करण्यात येईल, असेही त्या म्हणाल्या.
अंगणवाडीमध्ये शिक्षण घेणार्‍या बालकांना पोषण आहार पुरविला जातो. तसेच घरपोच पोषण आहारही पुरविण्यात येतो. यासाठी अंगणवाडी सेविकांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. त्यांनी संप के ल्यास या घटकाला पोषण आहार पुरविणे शक्य होणार नसून त्याचा परिणाम बालकांच्या पोषणावर होऊ शकतो. त्यामुळे महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा कायद्यात अंगणवाडी सेविकांचा समाविष्ट क रण्यात आला आहे.
’अस्मिता’ योजनेसाठी शासनाला निधीची तरतूद करावी लागणार नाही. गावोगावच्या महिला बचत गटांच्या माध्यमातून सॅनिटरी नॅपकिन बनवून त्या माफक दरात पुरविण्यात येणार आहे. त्यामुळे ग्रामीण तसेच गरीब कुटुंबातील महिलांना तसेच शालेय मुलींना मासिक पाळीच्या कालावधीत स्वच्छतेसंबंधीच्या आजारापासून मुक्तता मिळण्यास मदत होणार आहे.