Breaking News

कणकवली न.पं. निवडणुकीसाठी 17 पैकी 13 जागांवर शिवसेना-भाजप युती

सिंधुदुर्गनगरी, दि. 20, मार्च - महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष आणि आमदार नितेश राणे यांच्यासाठी ही निवडणूक जशी महत्वाची आहे, तशीच शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक, भाजपचे युवा नेते संदेश पारकर यांचेही भवितव्य या निवडणुकीत ठरले जाणार आहे. त्यामुळे शिवसेना, भाजपने या निवडणुकीत एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र सोमवारी सकाळी जागा वाटपावरून ही युती फिस्कटल्याची चर्चा सुरू झाल्याने पारकर आणि नाईक यांच्यात प्रचंड घालमेल दिसून आली. त्यामुळे ’तुझं माझं जमेना, आणि तुझ्यावाचून करमेना’ ही परिस्थिती बनल्याने अखेर या दोन्ही मित्रपक्षांनी 4 जागांवर मैत्रीपूर्ण लढतीचा निर्णय घेत युतीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता कणकवलीत शिवसेना - भाजप, स्वाभिमान - राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रीय काँग्रेस अशी तिरंगी लढत होणार आहे. गावविकास आघाडी देखील स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहे.


कणकवली नगरपंचायत निवडणुक शिवसेना, भाजपने स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र स्वाभिमानचे आव्हान मोडून काढायचे असेल तर युती शिवाय पर्याय नाही, हे कळून चुकल्याने शिवसेना, भाजपने युतीचा निर्णय घेतला. त्यानुसार या दोन पक्षांमध्ये युती होणार, हे रविवारीच निश्‍चित झाले. मात्र सोमवारी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी दुपारपर्यंत युतीबाबत तोडगा निघाला नव्हता. भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संदेश पारकर व शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक युतीसाठी आग्रही होते. पण दोन ते चार जागांवर बोलणी सफल होऊ न शकल्याने अखेर भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, संदेश पारकर आणि वैभव नाईक यांनी दुपारनंतर ही युती जाहीर केली.
17 पैकी 13 जागांवर ही युती झाली असून यामध्ये 8 जागा भाजप व 5 जागा शिवसेना लढवणार आहे. तर उर्वरित 4 जागांवर मैत्रीपूर्ण लढत होणार आहे. त्यामुळे संपूर्ण शहरात युती म्हणून मतदारांसमोर जाणारे शिवसेना भाजप 4 प्रभागांमध्ये मतदारांना कोणता संदेश देणार? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.