Breaking News

50 एकर जागेत पीएमआरडीएचे मेट्रो कारशेड

पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आहे. या मेट्राचे कारशेड माण येथील 50 एकर जागेवर उभारण्याचे प्राधिकरणाने प्रस्तावित केले आहे. ही जागा देण्यास काही जागामालक तयार नसल्याने पीएमआरडीएने याच जागेशेजारील 50 एकर जागेची निवड केली आहे. त्यामुळे पीएमआरडीएच्या मेट्रोसाठी कार शेडचा प्रश्‍न मार्गी लागणार आहे. 

शिवाजीनगर -हिंजवडी मेट्रो प्रकल्प विकसित केला जाणार आहे. या प्रकल्पाच्या कारशेडसाठी माण येथील 50 एकर जागा निश्‍चित करण्यात आली आहे. या जागेच्या भूसंपादनापोटी शेतकर्‍यांना द्यावयाच्या मोबदल्यासंदर्भात पीएमआरडीए, जिल्हा प्रशासन आणि जमीनधारकांमध्ये यापूर्वी बैठका झाल्या आहेत. या जागेच्या भूसंपादनाकरित जमीनधारकांना रेडिरेकनरनुसार परतावा देण्याबरोबर एकूण जागेच्या 10 टक्के विकसित भूखंड देण्याचा प्रस्ताव जमीन मालकांसमोर सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावाला सुमारे 80 टक्के जमीन मालकांनी सहमती दर्शविली आहे.जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी सांगितले, मेट्रो शेडसाठी जागा मिळण्यासाठी शेतकर्‍यांबरोबर संवाद सुरू आहे. कायद्याने मंजूर असणार्‍या दरानुसार जागामालकांना मोबदला देण्यात येईल. याचसह अन्य दुसरी जागा कारशेडसाठी निवडण्याबाबत विचार सुरू आहे. ही जागासुध्दा सुमारे 50 एकर आहे. या जागेच्या मालकांनीही सहमती दर्शविली आहे. जागेचा दुसरा पर्याय निवडल्याने प्रकल्पावर कोणताही फरक पडणार नाही. दोन्ही जागा मेट्रो कारशेडसाठी योग्य आहेत.