Breaking News

कोकण कृषी विद्यापीठाचे 300 मजूर सेवेत कायम होणार


रत्नागिरी,  दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील 300 अस्थायी मजूर सेवेत कायम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विद्यापीठातील नियमात बसणा-या सर्व अस्थायी मजुरांना कायम करण्याचा प्रस्ताव विद्यापीठाने तत्काळ पाठवावा असे आदेश कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी मंत्रालयात नुकत्याच झालेल्या बैठकीत दिले. त्यामुळे विद्यापीठात गेली कित्येक वर्षे अस्थायी म्हणून खितपत पडलेल्या मजुरांच्या कायम होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संतोष भुवड यांनी ही माहिती दिली.

याबाबत पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी पांडुरंग फुंडकर यांच्या दालनात बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला कुलगुरू डॉ. तपस भट्टाचार्य, कृषी विभागाचे प्रधान सचिव, विद्यापीठाचे कु लसचिव, नियंत्रक तसेच कामगार प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी झालेल्या चर्चेनंतर विद्यापीठाने लाल व पांढर्‍या मस्टरचा घातलेला घोळ त्यांच्या स्तरावर निस्तरावा. तसेच या सर्व अस्थायी मजुरांना कायम करण्याबाबत न्यायालयाच्या अधीन राहून अहवाल पाठवावा, असे आदेश पांडुरंग फुंडकर यांनी दिले. या निर्णायाचा विद्यापीठातील सुमारे 300 अस्थायी कामगारांना थेट लाभ होईल.