Breaking News

ठाणे मनपा 3,695 कोटींचा अर्थसंकल्प सादर


ठाणे,  कोणतीही करवाढ नसलेला तरीही पायाभूत सुविधांवर भर देणारा, शहराचा कायापालट करणा-या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर राबविण्यात आलेल्या प्रकल्पांचा समावेश असलेला, महिला, बाल कल्याण, दिव्यांग व्यक्ती विकास, शिक्षण, पर्यावरण आदी मह्त्वाच्या विषयासह नागरिकांच्या आनंदाची संकल्पना प्रत्यक्षात उतरविणारा ठाणे महानगरपालिकेचा सन 2017-2018 चा 3047 कोटी रूपयांचा तर सन 2018-2019 सालचा 3695 कोटी रूपयांचा मुळ अर्थसंकल्प महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी आज महासभेत महापौर मिनाक्षी शिंदे यांना सादर केला.

विशेष म्हणजे सन 2014-2015 या आर्थिक वर्षाच्या तुलनेत सन 2018-2019 च्या अर्थसंकल्पामध्ये तब्बल 1273 कोटी रूपयांची अभूतपूर्व अशी उत्पन्न वाढ प्रस्ता वित केली आहे. महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या कारकीर्दीतला हा चौथा अर्थसंकल्प असून या अर्थसंकल्पामध्ये शहराचा कायापालट करणा-या प्रकल्पांचा समावेश असून त्यामध्ये त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर राबविण्यात आलेल्या प्रकल्पांचा समावेश करण्यात आला आहे. या अर्थसंकल्पामध्ये कोणतीही करवाढ न करता प्राप्त उत्पन्नाच्या स्त्रोतापासून जास्तीत जास्त वसुलीवर भर देवून उत्पन्नात वाढ करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

यावर्षीच्या मुळ अर्थसंकल्पामध्ये मालमत्ता करापासून 600 कोटी, विकास व तत्सम शुल्कामधून 737 कोटी, वस्तू व सेवा कर अनुदान व थकित स्थानिक संस्था करापासून 811 कोटी, पाणी पुरवठा आकार 155 कोटी, रस्ते खोदाई फीमधून 125 कोटी, अग्नीशमन फी मधून 110 कोटी, जाहिरात फीमधून 20.75 कोटी, स्थावर मालमत्ता भाड्यामधून 19.40 कोटी अशा प्रकारे सन 2018-2019 या आर्थिक वर्षात 2690 कोटी रूपयांचे उत्पन्न प्रस्तावित केले आहे. त्याचबरोबर 279.98 कोटी रूपयांचे अनुदान आणि कर्जरोख्याद्वारे 535 कोटी असा 3695 कोटी रूपयांचा अर्थसंकल्प जयस्वाल यांनी महासभेस सादर केला.

सन 2018-2019 या आर्थिक वर्षात रस्ते विकासासाठी 363.30 कोटी, उड्डाण पूल व पादचारी मार्ग यासाठी 15 कोटी, ग्रेड सेपरेटरसाठी 25 कोटी, मुंबई-ठाणे मेट्रोसाठी तसेच ठाणे अंतर्गत मेट्रो प्रकल्पासाठी 20 कोटी, अंतर्गत जलवाहतूकीसाठी 10 कोटी, चौपाटी विकासासाठी 10 कोटी, महापालिका प्रभाग समिती कार्यालय इमारतींसाठी 6 कोटी, फ्लोटिंग मार्केटसाठी 10 कोटी अशी तरतूद करण्यात आली आहे. या वर्षीच्या अर्थसंकल्पातील सर्वात महत्वाचा भाग म्हणजे नागरिकांच्या आनंदाची संकल्पना डोळ्यासमोर ठेवून विशेष प्रकल्प प्रस्तावित करण्यात आले आहेत. त्यामध्ये ग्लोबल चॅलेंज फंड, सार्वजनिक व खाजगी शाळा भागीदारी प्रकल्प, रेडिओ स्कूल, सर्वांसाठी कौशल्य विकास, रे ऑफ लाईट, क्षयरोग नियंत्रण वाहन, समुपदेशन केंद्र, धूरविरहित केंद्र, समाज विकास व नागरिक केंद्रीत सुधारणा, जीआयएस सर्वे, अनुकूल ट्रॅफिक व्यवस्थापन यंत्रणा, डिजिटल मेसेजिंग सिस्टम आदी महत्वाच्या प्रकल्पांचा समावेश आहे.

याशिवाय स्मार्ट सिटी प्रकल्प, प्रशासकीय कामकाज सुधारणा. आरोग्य सुविधातंर्गत क्षयरोग दत्तक योजना, कुटुंब सौख्य योजना, संपूर्ण लसीकरणकरणा-या बालकांसाठी विशेष अनुदान, सुदृढ मातृत्व योजना, गर्भवती महिलांची सोनोग्राफी, प्रसुतीपूर्व बाळाच्या तपासण्या, करदात्यांसाठी विमा योजना, दारिद्र्यरषेखालील कुटुंबाकरिता वैद्यकीय सहाय्य योजना, किशोरवयीन मुलींना रूबेला लस, राजमाता जिजाऊ बेटी बचाओ-बेटी पढाओ योजना, हिरकणी योजना शिक्षण विभागातंर्गत विशेष आणि नाविण्यपूर्ण प्रकल्पांचा समावेश या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आला आहे..