Breaking News

भारतीय भाषांना प्राचीन परंपरा भाषेचे संवर्धन होणे आवश्यक - राज्यपाल

मुंबई  - भारतीय भाषांना उच्च साहित्यिक दर्जा, संस्कृती, या भाषा टिकवून ठेवून त्याचे संवर्धन होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्यपाल चे. विद्यासागरराव यांनी केले. प्रियदर्शनी अकादमीच्या 34 व्या वर्धापनदिनानिमित्त राज्यपाल चे. विद्यासागरराव यांच्या हस्ते विविध साहित्य पुरस्कार आणि शिष्यवृत्ती प्रदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास अकादमीचे अध्यक्ष निरंजन हिरानंदाणी,माणिक रुपानी, शिल्पा करीआ, राहुल कराड आदी मान्यवर उपस्थित होते.


यावेळी डॉ. नरेंद्र जाधव यांना बाळासाहेब ठाकरे स्मृती मराठी साहित्य पुरस्कार, हस्तीमल हस्ती यांना किशराम रुपाणी स्मृती हिंदी साहित्य पुरस्कार, श्रीमती माया राही यांना लक्ष्मी नारी पोहानी स्मृती सिंधी साहित्य पुरस्कार आणि डॉ. प्रविण दर्जी यांना श्रीमती चंदाबेन मोहनभाई पटेल गुजराती साहित्य पुरस्काराने राज्यपालांच्या हस्ते गौरविण्यात आले. तसेच शैक्षणिक शिष्यवृत्तीचेही वाटप करण्यात आले.
यावेळी राज्यपाल म्हणाले, महाराष्ट्राला संत आणि साहित्याची मोठी परंपरा आहे. साहित्यिकांनी लिहिलेल्या विचारांचा महाराष्ट्राच्या जनतेवर मोठा प्रभाव आहे. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, लोक मान्य टिळक, महर्षी कर्वे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, विठ्ठल रामजी शिंदे, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबरोबरच लेखक-साहित्यिकांचे विचार हे समाजातील अंधश्रध्दा, जाचक रुढी दूर क रण्यासाठी आणि समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी मार्गदर्शक ठरल्या आहेत. लेखक आणि कवी हे समाजाचे मुख्य घटक असून आज चार भाषेतील साहित्यिकांचा गौरव झाल्याबद्दल राज्यपालांनी आनंद व्यक्त केला.
एका अहवालानुसार जगात एकूण 25 भाषा 50 कोटी आणि त्यापेक्षा जास्त लोक बोलतात यापैकी हिंदी, बंगाली, पंजाबी, तेलगू,तामिळ आणि मराठी या भारतीय भाषांचा समावेश आहे. प्रत्येक भाषेची एक वेगळी शैली आहे. मराठी भाषा तर 60 वेगवेगळ्या बोली भाषेत बोलली जाते. हेच भाषेचे सौंदर्य असून भाषेचा लहेजा टिकवून ठेवणे याला महत्व आहे. समाजामध्ये राहणार्‍या लोकांनी भाषा स्वीकारली की ती भाषा समृध्द होते. म्हणूनच आजच्या तरुण, विद्यार्थी, शिक्षक आणि साहित्यिकांनी आपल्या भारतीय भाषांबद्दल आग्रही असणे आवश्यक असून त्यासाठी समाजातील प्रत्येकाने आपल्या भाषेबद्दल अभिमान ठेवण्याचे आवाहनही राज्यपालांनी यावेळी केले.