Breaking News

महाराष्ट्र 2019 पर्यत मोतीबिंदू मुक्त करणार - देवेंद्र फडणवीस

नागपूर/ मुंबई, दि. 19, मार्च - राज्यात मोतीबिंदूच्या आजाराने पिडीत रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून सध्या राज्यात साडेसतरा लाख मोतीबिंदू रुग्ण आहेत. त्यामुळे सर्व रुग्णावर मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करण्यात येऊन येत्या जुलै 2019 पर्यत सर्व रुग्णांची तपासणी करून त्यांच्या शस्त्रक्रियेची जबाबदारी शासन उचलून महाराष्ट्र मोतीबिंदू मुक्त करण्याचा संकल्प असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली. हिंदुस्तान कॉलनी स्थित सिटी प्रिमीयर कॉलेजच्या प्रांगणात आज नेत्र संस्थान व अनुसंधान केंद्रातर्फे संचालित माधव नेत्रालय सिटी सें टरचे लोकार्पण करण्यात आले. माधव नेत्रालय सिटी सेंटरचे लोकार्पण सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.


त्याप्रसंगी स्वामी अवधेशानंद गिरीजी महाराज, स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज, केंद्रीय परिवहन व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. जगतप्रसाद नड्डा, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यसभा सदस्य डॉ. सुभाष चंद्रा, महापौर नंदा जिचकार, माधव नेत्रालयाचे अध्यक्ष डॉ. श्रीकांत अंधारे आदी उपस्थित होते. नेत्र विकारावर कार्य करण्याची आवश्यकता असून शासनासोबतच खाजगी क्षेत्रातील डॉक्टर दररोज 175 रुग्णालयात किमान 10 तास मोतीबिंदू शस्त्रक्रिया करित आहेत. आतापर्यत 50 हजार शस्त्रक्रिया झाल्या असून आहेत. सन 2050 पर्यत देशात 11 कोटी लोक नेत्ररोगाने ग्रस्त होतील. महाराष्ट्र शासनाने यासाठी सक्रीय पुढाकार घेतला आहे. या पार्श्‍वभूमीवर माधव नेत्रालयाचे लोकार्पण होणे हे मध्य भारतासाठी सुवर्ण क्षण आहे.
गेल्या 20 वर्षापासून नेत्रदानाच्या कार्यात योगदान देणार्‍या माधव नेत्रपेढीचे नेत्रालयात रुपांतर झाले आहे. नागपूर शहर मेडिकल हब म्हणून विकसित होत आहे. माधव नेत्रालयामुळे यात मोलाची भर पडली आहे. माधव गोळवळकर गुरुजींनी सेवाभावनेतून या नेत्रदानाच्या यज्ञाची सुरुवात करीत समाजाला सम्यक दृष्टी दिली. ती दृष्टी येणार्‍या काळात लाभदायी ठरेल, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, देशात दर वर्षाला 5 लाख रोड दुर्घटनांमध्ये 2.50 लाख लोकांचा मृत्यु होतो. मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांचे अवयव त्यांच्या नातलगाच्या इच्छेने दान करता यावे याकरिता टीसीएसच्या मदतीने येणार्‍या काळात ड्रायविंग लाईसेन्स देतांना प्रत्येक वाहनचालकांकडून केलेला अवयव दानाचा संकल्प त्यात नमुद असणार आहे. याशिवाय दान क रण्यात आलेले अवयव गरजूंपर्यत पोहोचविण्यासाठी रुग्णालयाच्या छतावर हैलीपैड तयार करता यावे यासाठी प्रयत्न केले जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. जगतप्रसाद नड्डा म्हणाले कि मोतीबिंदू या आजारावर मात करण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीने प्रयत्न केले जात आहे. अर्थसंकल्पात ‘आयुष्यमान भारत’ या योजनेच्या माध्यमातून 10 कोटी परिवाराला 5 लाखाचा हेल्थ कव्हरेज देण्यात येणार आहे. याशिवाय देशातील 1.50 लाख सब सेंटरला वेलनेस सेंटर मध्ये परावर्तीत करण्याची प्रक्रिया सुरु झाली असून आतापर्यत 12 हजार वेलनेस सेंटर तयार करण्यात आले आहेत. या माध्यमातून आरोग्य सेवेला आधुनिकीकरणाची जोड देण्याचा प्रयत्न केला जात आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले की चांगले काम ईश्‍वराचे काम आहे. ‘आपलेपणा’ सेवेचा धर्म आहे. त्यामुळे देशातील संतांनी लोकांना सेवा पुरविणे हे आपले कर्तव्य मानले. याच आपलेपणाची भावना ठेवून सुरु करण्यात आलेल्या या माधव नेत्रालयात गरजूंना डोळ्यासंबंधीच्या रोगांची आधूनिक उपचार पद्धती मिळणार असल्याचे त्याचा लाभ जास्तीत जास्त लोकांनी घ्यावा, असे आवाहन केले.
उपस्थित स्वामी अवधेशानंद गिरीजी महाराज, स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज, राज्यसभा सदस्य डॉ. सुभाष चंद्रा यांनी समायोचित विचार व्यक्त करून नेत्रदान करण्यास सर्वांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. माधव नेत्रालयाच्या ‘नेत्र संजीवनी’ या स्मरणिकेचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते इंडियन ग्रीन बिल्डींग काऊंसिल द्वारा मंजूर ग्रीन बिल्डींग प्रमाणपत्र माधव नेत्रालयास देण्यात आले. शिरीष दारव्हेकर यांनी महामहिम राष्ट्रपती रामनाथ गोविंद तसेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा शुभेच्छा संदेश यावेळी उपस्थितांना वाचून दाखविला. याशिवाय नेत्रालयाच्या निर्मितीस योगदान देणार्‍या व्यक्तीचा स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अविनाशचंद्र अग्निहोत्री तसेच संचालन मनीषा काशीक र यांनी केले. आभार डॉ. श्रीकांत अंधारे यांनी मानले.
माधव नेत्रालयात सुविधा
माधव नेत्रालय येथे गरीब जनतेसाठी निशुल्क शस्त्रक्रिया सेवा, नेत्रबँक, नेत्र प्रत्यारोपण सुविधा, रोबोटिक फेन्टोसेकण्ड लेजर ब्लेड तंत्राद्वारे मोतीबिंदू शस्त्रक्रिया, ऑप्टोमेट्री व कॉन्टैक्ट लेन्स, सामान्य नेत्र चिकित्सा विभाग, कॉर्निया, रिफॅक्टिव सर्जरी, रेटिना व्हीट्रियस व पोस्टीरियर सेगमेन्ट, अल्पदृष्टी सुविधा, काचबिंदू लेजर ऑपरेशन, बाल नेत्ररोग शस्त्रक्रिया, ऑर्बिट व ऑक्युलोप्लास्टी, आधुनिक पॅथॉलॉजी व माईक्रोबायोलॉजी लॅब अशा सुविधा उपलब्ध होणार आहे. येणार्‍या काळात माधव नेत्रालयाचे माधव प्रिमीयर सेंटर देखील स्थापन होणार आहे.