Breaking News

तुकाई चारी मंजूरीसाठी महामोर्चाचे आयोजन लाभार्थी गावांचा 1995 पासून संघर्ष


कर्जत तालुक्यातील 17 पेक्षा जास्त गावांना वरदान ठरणार्‍या तुकाई चारीस मंजुरी देण्यात यावी म्हणून या साठी कर्जत येथील सहकारी बँकेमध्ये सर्व विरोधीपक्षाच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. परंतू या परिषदेत केवळ काँग्रेसचे नेते उपस्थित राहिले. यामध्ये अ‍ॅड. कैलास शेवाळे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष किरण पाटील, दादासाहेब सोनमाळी, बाळासाहेब साळुंके, सरचिटणीस तात्यासाहेब ढेरे, नगरसेवक सचिन घुले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक हर्षल शेवाळे, नगरसेवक डॉ. बरबडे आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना कैलास शेवाळे म्हणाले की, कर्जत तालुक्यातील अवर्षण प्रवर्तन क्षेत्रातील व समुद्र सपाटीपासून अत्यंत उंचीवर असलेल्या टंचाईग्रस्त भागातील गावे खांडवी, कोंभळी, कौडाणे, मुळेवाडी, चांदे बु. मारूतीचे चांदे, सुपे, वालवड, डिकसळ, टाकळी खंडेश्‍वर, चिंचोली काळदाते, खंडाळा, बहिरोबावाडी, गुरवपिंप्री, रमजान चिंचोली, गोंदर्डी, रेहकुरी, खुरांगे वाडी, बिटकेवाडी, पाटेगांव, जळगाव, माळवाडी, खंडाळा, गोयकर वाडा, बाभुळगाव खा. आदी गावांना कुकडी डावा कालव्यातून तुकाई चारीच्या मंजूरीमधून पाणी मिळणार आहे. या चारीसाठी 1995 पासून संघर्ष सुरू असून 12 ऑक्टोबर 1998 रोजी वरील गावातील लोकांनी कर्जत येथे भव्य मोर्चा काढला होता. एकनाथ खडसे पाटबंधारे मंत्री असताना त्यांना तुकाई चारीस मंजुरी बाबत पत्र दिले होते. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार ना. राम शिंदे यांनी निवडून आल्यानंतर एक महिन्याच्या आत तुकाई चारीस मंजुरी घेईन असा शब्द या भागातील शेतकर्‍यांना दिला होता, मात्र या शब्दावर विश्‍वास ठेवून जनतेने प्रचंड प्रमाणात मतदान केले. ते मंत्री होऊन चार वर्षे झाली तरी तुकाई चारीस मंजुरी मिळवता आली नाही. गुरवपिंप्री येथील सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब सुर्यवंशी हे तुकाई चारीसाठी कर्जत तहसील कार्यालयासमोर एक वर्षापासून धरणे आंदोलन करतात. परंतू राम शिंदे व महाराष्ट्र शासन या चारीच्या मंजुरीसाठी कानाडोळा करीत असल्याचा आरोप कैलास शेवाळे यांनी पत्रकार परिषदेत केला. यावेळी किरण पाटील म्हणाले की, आम्ही दि. 26 मार्च रोजी तहसील कार्यालयावर महामोर्चा काढणार असल्याने पालकमंत्री यांनी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन 22 मार्च रोजी तुकाई चारीबाबत मिटींग ठेवली आहे. परंतू या मिटींगमध्ये चारीबाबत निर्णय न झाल्यास आम्ही आमचा मोर्चा दि. 26 ऐवजी 2 एप्रिल रोजी काढणार आहोत. या पत्रकार परिषदेत तात्यासाहेब ढेरे म्हणाले की, पालकमंत्री यांनी कर्जत तालुक्यात ट्रामासेंटर हॉस्पिटल करणार, पोलीस प्रशिक्षण केंद्र सुरू करणार, कृषी उत्पन्न बाजार समित्यांना 200 कोटी रुपये मंजूर करणार, कर्जतचे एसटी डेपो मंजूर करणार, तालुक्यात एमआयडीसी करण्यात येईल तसेच काचेसारखे रस्ते बनविण्यासाठी प्रयत्न करणार आदी घोषणांचे काय झाले. या वेळी दादासाहेब सोनमाळी म्हणाले की, पालकमंत्री यांनी मंत्रालयात मिटींग घेऊन जनतेची दिशाभूल करण्याऐवजी चारीच्या कामाचा नारळ फोडून शुभारंभ करावा. पालकमंत्र्यांनी मतदारसंघातील प्रश्‍नाबाबत मिटींगमध्ये चर्चा केली तरी बातम्यांमध्ये मंजूर झाल्याचे सांगितले जाते.