Breaking News

मेहूल चोकसीची 1217 कोटीची संपत्ती जप्त


नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेला हजारो कोटींचा गंडा घालणा़र्‍या आरोपी मेहुल चोक्सीच्या तब्बल 41 मालमत्तांवर ईडीने जप्ताची कारवाई केली असून, चोक्सीच्या जप्त केलेल्या या मालमत्तांची किंमत तब्बल 1217 कोटी रूपये इतकी आहे. यामध्ये मुंबईतील 15 घरे आणि 17 कार्यालयांचा समावेश आहे. जप्त करण्यात आलेल्या संपत्तीमध्ये अलिबाग, ना शिक, नागपूर, पनवेल व विल्लुपुरममधील 231 एकर जमिनीवर पसरलेली संपत्ती आणि आंध्र प्रदेशातील रंगारेड्डी जिह्यातील 170 एकर जमिनीवरील एक हार्डवेअर पार्कचारी समावेश आहे. या पार्कची किंमत 500 कोटी रूपये एवढी आहे.
डायमंड किंग नीरव मोदी आणि मेहुल चोकसी यांनी पीएनबी बँकेत कर्ज घोटाळा करुन परदेशात पोबारा केला आहे. मात्र सीबीआय आणि ईडीकडून या दोघांच्या मालमत्तांवर जप्तीची कारवाई सुरुच आहे. दरम्यान, यापूर्वीही ईडीने नीरव मोदीच्या 9 आलिशान कार जप्त केल्या होत्या. ज्यामध्ये एक रोल्स रॉयस घोस्ट, दोन मर्सिडिज, एक पोर्शे, तीन होंडा, एक टोयोटा फॉर्च्युनर आणि एका टोयोटा इनोव्हाचा समावेश आहे. जप्त केलेल्या नऊ कारची किंमत 10 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. यासोबतच ईडीने नीरव मोदीचे म्युच्युअल फंड आणि शेअर्सही गोठवले आहेत. ज्याची किंमत सध्या 7 कोटी 80 लाख रुपये सांगितली जात आहे. याचप्रमाणे या घोटाळ्यातील दुसरा आरोपी आणि नीरव मोदीचा मामा मेहुल चोक्सीच्या संपत्तीवरही ईडीची कारवाई सुरु आहे. ईडीने मेहुल चोक्सीचे 72 कोटी 80 लाख रुपयांचे शेअर्स गोठवले आहेत. मामा भाच्याच्या या जोडीने पीएनबीत साडे अकरा हजार कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे.