Breaking News

बसस्थानकावर प्रवाशांच्या आरोग्याशी जीवघेणा खेळ विक्री होत असलेल्या पदार्थांच्या सुरक्षिततेबाबत निष्काळजी

बसस्थानकावरील अस्वच्छतेचा प्रश्‍न कायमच चर्चेचा विषय बनला आहे, कोणत्या ना कोणत्या पद्धतीने बसस्थानकावर स्वच्छतेचा प्रश्‍न डोके वर काढत आहे, यामध्येच काही दिवसांपुर्वी बसस्थानकावर असणारा कचरा आणि पाण्याच्या टाकीची दुरावस्था याकडे दैनिक लोकमंथनच्या माध्यमातुन लक्ष घातले होते, त्यानंतर याकडे संबंधीतांनी याठिकाणी स्वच्छता करून घेण्यात आली.


आजमितीस सर्वत्र केंद्र सरकारसह राज्य सरकारकडूनही स्वच्छतेचे अनेक धडे दिले जात आहेत, परंतु या सर्व गोष्टींकडे राज्य परिवहन महामंडळाच्या बसस्थानकावरील अस्वच्छता राहून-राहून समोर येत आहे,
यामध्ये बसस्थानकांवर अन्न पदार्थांची विक्री करणारे विक्रेते प्रवाशांच्या आरोग्याशी जीवघेणा खेळ खेळत असल्याचे दिसून येत आहे, यामध्ये हे विक्रेते बसस्थानकावर येणार्‍या प्रत्येक बसमध्ये अन्नपदार्थांची विक्री करत असतात, परंतु यावेळी या विक्रेत्यांमार्फत कोणत्याही प्रकारची सुरक्षितता किंवा काळजी घेत नसल्याचे दिसून आले आहे, त्याचबरोबर बसस्थानकावरील साफसफाई करण्याचे काम सकाळी 9 वाजेपर्यंत कामकाज सुरू असते, त्यामुळे सफाई सुरू असताना अधिक प्रमाणावर धुळ उडत असते, तीच धूळ या खाद्यपदार्थांवर बसली जाते, त्याचा प्रवाशांच्या आरोग्यावर विघातक परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे, बसस्थानकाची स्वच्छता करत असताना स्वच्छता करणार्‍या कर्मचार्‍यांनी सकाळी सकाळी बसस्थानकावर प्रवाशांची वर्दळ सुरू होण्यापुर्वीच बसस्थानकाची साफसफाई करून घेणे आवश्यक वाटते, कारण बर्‍यापैकी बसमध्ये वयोवृद्ध, ज्येष्ठ नागरिक अधिक प्रमाणात प्रवास करत असल्याचे दिसून येते, या वयोगटातील प्रवाशांना अधिक प्रमाणात श्‍वसनाचे आजार, धुळीची अ‍ॅलर्जी अशा प्रकारचे त्रास असतात, त्यामुळे या धुळीचा प्रवाशांना अधिक प्रमाणात त्रास होत असल्याचे दिसून येत आहे. मागील एक दोन महिन्यांपासुन सर्व बसस्थानकांच्या स्वच्छतेची जबाबदारी एका खाजगी कंपनीकडे सोपविण्यात आली आहे. याठिकाणी दररोज बसस्थानकाची स्वच्छता होत असताना दिसत असली तरिदेखील बसस्थानकाच्या पुर्वेकडील भागामध्ये असणारी अस्वच्छता आजही जैसे थे परिस्थितीमध्ये असल्याचे दिसून येत आहे.