Breaking News

जिल्हाधिकार्‍यांकडून सर्वसाधारण सभा अवैध घोषित


राजकीय दृष्ट्या चर्चेत राहिलेल्या तालुक्यातील जोहरापूर ग्रामापंचायतीच्या उपसरपंच पदाच्या निवडीसाठी बोलविण्यात आलेली विशेष सर्वसाधारण सभा जिल्हाधिकारी अभय महाजन यांनी अवैध घोषित करून उपसरपंच रोहन लांडे यांचे पद संपुष्टात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. तालुक्यातील जोहरापूर ग्रामापंचायतीची निवडणूक संपूर्ण तालुक्यात गाजली. यात राष्ट्रवादीचे दिलीप लांडे यांच्या गटाला 6 तर भाजप ओबीसी मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस शिवाजी खेडकर यांच्या गटाला 3 जागा मिळाल्या होत्या. उपसरपंच पदाच्या निवडीसाठी सदस्यांची विशेष सर्वसाधारण सभा 25 नोव्हेंबर 2017 रोजी बोलविण्यात आली होती. या वेळी गुप्त पद्धतीने मतदान घेण्यात यावे अशी मागणी शिवाजी खेडकर, रवींद्र उगलमुगले, शोभा राजेंद्र पालवे या तीन सदस्यांनी लेखी स्वरूपात केली होती, मात्र सभेचे अध्यक्ष सरपंच जालिंदर वाकडे यांनी उघड मतदान घेतले म्हणून वरील तीन सदस्यांनी ही निवडणूक रद्द करावी अशी मागणी जिल्हाधिका-यांकडे अपील दाखल करून केली होती. त्यावर जिल्हाधिका-यांनी वरील प्रमाणे आदेश दिले.या निवडणुकीत गुप्त पद्धतीने मतदान घेतले असते तर, कदाचित वेगळा निकाल लागला असता म्हणून प्रस्थापितांनी अधिकारी व कर्मचा-यांवर दबाव आणला मात्र अखेर सत्याचा विजय झाला अशी प्रतिक्रीया ग्रा.पं. सदस्य शिवाजी खेडकर, रवींद्र उगलमुगले व शोभा पालवे यांनी या निकालानंतर व्यक्त केली.