शिक्षण मंत्र्यांचा खुलासा वस्तुस्थितीशी विसंगत - विखे पाटील
शिक्षण मंत्र्यांनी केलेल्या खुलाशांवर त्यांनी असहमती दर्शवली. यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना ते म्हणाले की, शाळेत वितरीत होऊ घातलेल्या पुस्तकांमध्ये आक्षेपार्ह मजकूर नसल्याचा तावडे यांचा दावा चुकीचा आहे. पुणे येथील पत्रकार परिषदेत आपण ज्या पुस्तकांमधील मजकूर वाचून दाखवला, तीच पुस्तके शाळांमध्ये वितरीत केली जाणार होती. परंतु, पुस्तकांमधील आक्षेपार्ह मजकूर समोर आणल्यानंतर शिक्षण विभागाने मूळ पुस्तकांचे गठ्ठे गायब केले असून,प्रकाशकांना 5-6 दिवसात सुधारित पुस्तके छापण्याची तंबी देण्यात आली आहे.
शिक्षण मंत्री म्हणतात की, विरोधी पक्षनेत्यांनी दाखवलेली पुस्तके कुंभमेळ्यात वितरित झाली होती. शाळांना दिली जाणारी पुस्तके वेगळी आहेत. पण एकाच प्रकाशकाची एकाच नावाची दोन वेगवेगळी पुस्तके कशी असू शकतात? अशी विचारणाही विखे पाटील यांनी केली. ‘बाळ नचिकेत’ या पुस्तकाबाबत खुलासा करताना शिक्षण मंत्र्यांनी ‘ऋषी अत्री’, ‘श्री शारदा माता’ या पुस्तकांचा जाणीवपूर्वक उल्लेख केला नाही. यावरून शिक्षण मंत्री लपवाछपवी करीत असल्याचे स्पष्ट होते.
या पुस्तकांच्या खरेदीत आर्थिक गैरव्यवहार झाल्याचाही आरोप आम्ही केला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडीत प्रकाशन ‘भारतीय विचार साधना’ यांचे जे पुस्तक 20 रू पयाला उपलब्ध आहे, तेच पुस्तक सरकारने चक्क 50 रूपयांत खरेदी केले असून,या प्रकाशनाकडून तब्बल 8 कोटी 17लाख रुपयांची खरेदी झाली आहे. ही पुस्तके तब्बल अडीच पट जादा किंमतीने का खरेदी करण्यात आली,याबाबत शिक्षण मंत्र्यांनी केलेला खुलासा समाधानकारक नाही, असेही विखे पाटील यांनी सांगितले.
