Breaking News

नाशिकच्या गंगाघाटावरील अतिक्रमण हटवले

नाशिक - महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांचा गोदापार्क व रामकुंड परिसरासह टाळकुटेश्‍वर पुलापर्यंत पाहणी दौरा झाला होता. या दौ-यात गौरी पटांगण येथील अनधिकृत वाळूचे ठिय्ये व झोपड्यांचे अतिक्रमण काढण्याचे संकेत दिले होते. यानंतर गुरुवारी गंगाघाटावरील झोपड्या अतिक्रमण विभागाने हटवल्या. मात्र येथील वाळूमा फियांना त्यांनी साठवणूक केलेली वाळू व विटा हलवण्यास बुधवार व गुरुवार असे दोन दिवस दिल्याने वाळूमाफियांवर मनपा अधिकारी मेहेरबान असल्याचे दिसून आले.

मंगळवारी मनपा आयुक्तांच्या दौर्याच्या पार्श्‍वभूमीवर अतिक्रमण विभागाच्या पथकाने बुधवारी दुपारी गंगाघाटावर जात उघड्यावर वास्तव्य करणार्या नागरिकांना या ठिकाणाहून स्थलांतर करा अन्यथा झोपड्यांचे अतिक्रमण हटवण्याची कारवाई करण्याचा इशारा दिला होता. मात्र दुसरीकडे राजकीय वरदहस्त असलेल्या वाळूच्या ठिय्याधारकांकडे दुर्लक्ष के ल्याचे चित्र होते. यानंतर पुन्हा गुरुवारी सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास पंचवटी विभागीय अधिकारी बी.वाय.शिंगाडे एक जेसीबी आणि गोदाघाटावरील काही सुरक्षारक्षकांना घेऊन या ठिकाणी दाखल झाले. त्यांनी पाल टाकून बस्तान बसवलेल्या कुटुंबांना आपले साहित्य काढण्यास सांगितले. यावेळी स्थायिक असलेल्या कुटुंबांनी तासाभरात आपले साहित्य या जागेवरून काढून घेतले. यांनतर जेसीबीच्या सहाय्याने कर्मचा-यांनी येथील दगड-विटा व इतर साहित्य गोळा केले. 
आयुक्तांच्या दौ-यानंतर सलग दोन दिवस गंगाघाटावर घिरट्या घालणा-या अतिक्रमण विभागाने केवळ झोपडपट्टीधारकांना कारवाईचा बडगा दाखवताना दुसरीकडे वाळू ठिय्याचालकांना चकार शब्दानेदेखील विचारणा केली नाही हे विशेष. वर्षानुवर्षे या ठिकाणी वाळूमाफियांकडून वाळू व विटांचा व्यवसाय केला जात असून एकप्रकारे गंगाघाटावर त्यांची मक्तेदारी झाल्याचे चित्र आहे. असे असतानादेखील मनपा अधिका-यांनी त्यांची वाळू-विटा साहित्य जप्त करणे अपेक्षित असताना त्यांना दोन दिवसांचा पुरेसा वेळ दिल्याने वाळूमाफियांबरोबर मनपा अधिका-यांचे आर्थिक हितसंबंध असल्याचे लपून राहिलेले नाही.