Breaking News

हिवरा नदीपात्रात वाळूमाफियांचा बेशुमार वाळु उपसा प्रशासनासह महसुल विभागाचा कानाडोळा


माजलगाव(प्रतिनिधी)- माजलगाव तालुक्यातील हिवरा नदीचे पात्र हे मोठे असुन या पात्रातून दिवस रात्र मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू आहे. याकडे महसूल अधिकारी व प्रशासनाने सोयीस्कररीत्या डोळेझाक केल्याने वाळूमाफिया सैराट झाले असुन सलग सुरू असलेल्या उपश्यामुळे नदीपात्रात महाकाय खड्डे पडले आहेत. परिणामी पात्राचे वाळवंट झाल्याने परिसरातील भूगर्भातील पाणीपातळी मोठ्या प्रमाणात खालावली आहे.
हिवरापात्रात असलेल्या वाळूचे 24 तास वाळूउपसा हा सुरू आहे. जागोजागी वाळूचे साठे केले असुन अवैध वाळूबाबत जास्तच ओरड झाल्यास कारवाईचा निव्वळ दिखावा केला जातो. त्यामुळे परिस्थिती पुन्हा जेसेथे होऊन जाते.रात्रंदिवस मोठमोठे हायवा गाड्या भरधाव वेगाने जातात. बिनधास्तपणे होत असलेल्या या गौणखनिजाच्या चोरीमुळे अनेक जण गब्बर होत गेले आहेत. त्यामुळे पोलीस व महसुल प्रशासनाच्या आशीर्वादानेच हा प्रकार सुरू असल्याचे आता नागरिक उघडपणे बोलत आहेत. या गोरखधंद्यांमुळे शासनाचा महसूल तर बुडत असला तरी विशिष्ठ अधिकारी वर्ग मात्र अल्पवधीतच मालामाल होताना दिसत आहे.
विशेष म्हणजे पोलीस प्रशासनाने रात्री गावोगावी गस्त घालण्याऐवजी ते रात्रभर फक्त वाळूमाफियाकडून हप्ता वसुलीसाठी फिरतात. प्रशासनापेक्षा वाळूमाफियांची यंत्रणा हायटेक
कोणता अधिकारी कुठे आहे, कुठून येतात याची सर्व माहिती वाळूमाफियाच्या लोकेशन असते. हा कारभार स्कारपियो, स्विफट, बुलेट अशा गाड्यांमधून चालतो. लोकेशनमुळे महसुल अधिकारी आले तरी त्यांच्या हाती काही लागत नाही. यामुळे वाळूमाफियाना कोणत्याही अधिकार्यांचे भय राहिलेले नाही. हप्ता देण्याची पद्धतही आता हायटेक झाली आहे. एजंटमार्फत पोलिसांना प्रत्येक गाडीचा रोज हप्ता दिला जातो. एसएमएसद्वारे गाडी क्रमांक पाठवून हप्ता दिला जातो. यामुळे अश्या माफियांवर थातुरमातुर गुन्हा नोंदकरून सोडुन दिले जाते, मात्र ठोस अशी कारवाई काही होत नाही.
महसूल व पोलीस प्रशासन वाळूमाफियांपुढे हतबल झाले का? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. वाळू म्हणजे पैसे छपाईचे यंत्रच आधुनिक मशिन्नरीचा वापर करत जोरदार वाळू उपसा होऊ लागला आहे. या मुळे तरुणांचा ओढा वाळू उपसाच्या नादाला लागला असल्याने पैश्याची हव्यास वाढू लागल्याने हायटेक यंत्रणेचा वापर करत जेसीबी, पोकलेन याने वाळू उपसा होऊ लागल्याने बक्कळ पैसा मिळू लागल्याने हा पैसा कोठे खर्च करायचा म्हणून काहींनी सफेद पोश राजकारणात प्रवेश केला आहे.