Breaking News

दखल - दादा आणि भेटवस्तू !

भाजप सरकार हजारो कोटी रुपये खर्चून देशात व राज्यांत आम्ही किती कामं केली, आमच्या योजनांचे लाभार्थी वेगवेगळ्या घटकांत कसे आहेत आणि त्यांना हे माझं सरकार आहे, असं का वाटतं, याचा मारा लोकांवर केला. असं असेल, तर लोकोपयोगी कामाच्या जोरावर मतांची मागणी करण्यात काहीच हरकत नाही. भाजपला भावनिक मुद्यांचाही आधार घ्यायला नको. लोकांना भाजपचं सरकार आपलं वाटत असेल, तर सत्ताधारी पक्षाला खरं तर प्रचाराचीही गरज भासू नये. आम्ही विकासकामं केली, आमचं काम आता संपलं, जनता आता तिचं काम करेल, असा विश्‍वास भाजपच्या नेत्यांना वाटायला हवा; परंतु तसा तो वाटत नाही. त्यामुळं तर भाजपच्या नेत्यांना लक्ष्मी, भेटवस्तू अशांचा आधार घ्यावा लागत असावा आणि सरकारला आपली प्रतिष्ठा वापरून, चौकशी अधिकार्‍यांवर दबाव टाकून नेत्यांना सहीसलामत बाहेर काढावं लागतं.
नोटाबंदीअगोदर सर्व पैसे पांढरे करून भाजपनं नोटाबंदी जाहीर केली असे जे आरोप विरोधी पक्ष करीत आहेत, त्या आरोपात अशी प्रकरणं बाहेर आली, की तथ्य आहे, असं वाटायला लागतं. गुजरातच्या निवडणुकीच्या दुसर्‍या टप्प्यांत मोठी आर्थिक उलाढाल झाल्याचं जे सांगितलं जातं, त्यामागंही भेटवस्तू आणि लक्ष्मीदर्शनाचा प्रभाव असावा, असं कुणी म्हणालं, तर त्याला काय करायचं? यशवंतराव गडाख व बाळासाहेब विखे यांच्या 1991 च्या लोकसभा निवडणुकीनं देशाला आचारसंहिता दिली. टी. एन. शेषन यांच्यासारख्यांनी ती कार्यक्षम पद्धतीनं राबविली; परंतु त्यांच्या नंतर आलेल्या निवडणूक आयुक्तांना ती कार्यक्षमतेन वापरता आली नाही. उलट, आचारसंहितेचा बडगा दाखवून खिसे भरण्याचे प्रकार झाले. निवडणूक अधिकारी गोपनीयपणे नेत्यांच्या दावणीला बांधल्याचं चित्र होतं.
भाजप देशात व राज्यात नंबर एकचा पक्ष आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकासाच्या आणि पारदर्शकतेच्या मार्गावरून चालण्याचा कानमंत्र दिला असताना पैठणच्या सभेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी लक्ष्मी आली, तर तिचं स्वागत करा. तिला टाळू नका; परंतु मतदान आम्हाला करा, असं थेट मतदारांना सांगितलं. त्यांचं हे भाषण कॅमेर्‍यात कैद झालं. लोकांनी वाहिन्यावर ते अनेकदा पाहिलं; परंतु त्यावर तक्रार होऊनही गेल्या वर्षभरात काहीही कारवाई झाली नाही. उलट, ज्यांच्यासमोर ही चौकशी सुरू होती, त्या अधिकार्‍यांनाच अन्यत्र हलविण्यात आलं. भाजपचे राज्यातील नंबर दोनचे मंत्री असलेले चंद्रकांतदादा तर अतिशय पारदर्शी! रस्त्यांच्या कामावर डांबर कमी वापरा; परंतु सार्वजनिक बांधकाम खात्याची प्रतिमा चांगली राहण्यासाठी ते पैसे पत्रकारांवर खर्च करा, असं त्यांनी जळगावला सांगून टाकलं. इतकं थेट बोलणारा मंत्री जगात अन्यत्र नसावा. चोरून लपून काही करायचं नाही, इतका पारदर्शीपणा त्यांच्या अंगी असावा. आताही सांगली महानगरपालिकेच्या निवडणुकीत त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना किती महत्वाचा सल्ला दिला आहे, हे लक्षात घ्या मतदारांना भेटवस्तू देऊन संपर्क वाढवा, असं, यशाचं उघडं गुपित त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं. 

गेल्या महिन्यातही याच चंद्रकांतदादांनी आपण भाषाप्रभू आहोत, हे दाखवून दिलं होतं. मराठी, हिंदी, इंग्रजीसोबतच कन्नड भाषेवरही त्यांचं प्रभुत्त्व असावं.त्यांच्या अंगच्या एका एका कलागुणाची माहिती अशी अधूनमधून होत असते. त्यांच्याकडं चांगली गायकी आहे, त्यांना गळा आहे, हे त्यांनी गोकाकमध्ये म्हटलेल्या कन्नड गाण्यावरून लक्षात आलं. इतकी वर्षे महाराष्ट्रापासून त्यांचा हा गुण लपून राहिलेला होता.
पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांचा चंद्रकांतदादांवर चांगलाच प्रभाव असावा, म्हणून तर त्यांनी मतदारांशी संपर्क वाढवण्यासाठी कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन भेटवस्तू द्यावी, असा सल्ला भाजप कार्यकर्त्यांना दिला आहे. मंत्रिपदावरील एका जबाबदार व्यक्तीनं अशा प्रकारचं वक्तव्य केल्यामुळं आश्‍चर्य व्यक्त केलं जात आहे. सांगली महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. भाजपनंही महापालिकेत सत्ता आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे शनिवारी सांगलीत पक्षानं कार्यकर्त्यांचं बूथ प्रशिक्षण आयोजित केलं होतं. बूथ रचना झाली आहे, 15 दिवसांत कार्यकर्त्यांनी किमान 200 घरी जाऊन मतदारांशी संपर्क वाढवला पाहिजे. 

मतदारांची भेट घेऊन कार्यकर्त्यांनी त्यांना भेटवस्तू द्यावी, असं ते कार्यकर्त्यांना म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. गेल्या महिन्यातही पाटील यांनी कर्नाटकातील गोकाक येथील एका कार्यक्रमात कन्नडमध्ये गाणे म्हणून वाद निर्माण केला होता. गोकाक तालुक्यातील तवग गावातील दुगार्देवी मंदिराच्या उद्घाटनाला त्यांनी हजेरी लावली. मंदिराचं उद्घाटन केल्यानंतर भाषणाची सुरुवात ह्यहुट्टीदरे कन्नड नाडू हुट्टू बेकू (जन्माला यायचे तर कर्नाटकात जन्म घ्यावा) या कन्नड गाण्यानं करून उपस्थितांना खूश करण्याचा पˆयत्न केला होता; पण पाटील यांनी कन्नड गाणं म्हणून सीमाभागातील मराठी भाषिकांच्या जखमेवर मीठ चोळल्याची पˆतिक्रिया उमटली होती. यापूवीर्ही चंद्रकांतदादा आपल्या वक्तव्यांमुळं अडचणीत आले आहेत. मागं अन्य पक्षातल्या नेत्यांना वेगवेगळ्या महामंडळावर स्थान देण्याच्या भूमिकेचं समर्थन करताना त्यांनी एवढ्या मोठ्या महामंडळावर कार्यकर्त्यांची वर्णी लावायची म्हणजे भाजपत असे कार्यकर्ते दुर्बीण घेऊन शोधावे लागतील, असं म्हटलं होतं. स्वत: च्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची क्षमता इतक्या तटस्थपणे दादांशिवाय आणखी कोण ओळखू शकेल?

शेतकर्‍यांच्या कर्जमाफीवरही त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. सरकार असेच सगळे माफ करत गेले, तर एके दिवशी सरकारची परिस्थिती कर्जबाजारी शेतकर्‍यांप्रमाणं होईल असं त्यांनी म्हटलं होतं. 15 डिसेंबरपर्यंत राज्यातील सर्व रस्ते खड्डेमुक्त करण्याची घोषणा करणार्‍या चंद्रकांतदादांनी स्त्यांच्या स्थितीवरून वादगˆस्त वक्तव्य केलं आहे. रस्त्यावर खड्डे पडले म्हणजे आभाळ कोसळलं नाही, असं त्यांनी म्हटलं होतं. रस्त्यांवरील खड्डे हे जुनेच आहेत. आता नव्याने खड्डे पडलेले नाहीत, असं अजब तर्कट त्यांनी मांडलं होतं. सांगलीत खड्डेमुक्तीवरून सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटलांची त्यांच्याच सहकारी मंत्र्यानं पोलखोल केली होती. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी सांगलीचे माजी आमदार दिनकर पाटील यांच्या सत्काराच्या कार्यक्रमात खड्डेमुक्तीवरून भाष्य केलं. सांगलीत रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ते याचा शोध घ्यावा लागेल असं वक्तव्य करीत त्यांनी चंदकांतदादांना घरचा आहेर दिला होता. शेतकर्‍यांच्या कर्जमाफीवरून ही देशमुख यांनी चंद्रकांतदादांना अडचणीत आणलं होतं. सांगली शहरात खड्डेच खड्डे असल्याची जाहीर कबुलीच सुभाष देशमुख यांनी दिली. चंद्रकांतदादा देखील या कार्यक्रमात उपस्थित होते. मात्र, सहकार्‍याच्या शेरेबाजीनंतर त्यांनी तेथून काढता पाय घेतला होता.