Breaking News

आरोपीच्या भावाकडून जीवे मारण्याची धमकी


तालुक्यातील टाकळीमिया येथे घडलेल्या अल्पवयीन मुलीच्या खून प्रकरणात आरोपी संजय बर्डे याच्या भावाने पिडित मुलीच्या आई, वडिल तसेच परिसरातील नागरिकांना धमकी दिल्याने पोलिस ठाण्यात आदिवासी समाजाने ठिय्या मांडला होता. पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करत आरोपींवर कारवाईचे आश्‍वासन दिल्याने आंदोलकांनी माघार घेतली. टाकळीमिया भागात नुकतेच मनिषा रोहिदास वाघ (13 वर्ष) या अल्पवयीन मुलीचा गळा दाबून खून केल्याची कबूली आरोपी संजय गोपीनाथ बर्डे याने दिली. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपी संजय बर्डे याने मुलीचा मृतदेह मुसळवाडी तलावालगतच्या ऊसाच्या क्षेत्रात मध्यवर्ती भागात टाकून दिला होता. दरम्यान, पोलीस विभागीय अधिकारी व पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी शिताफीने आरोपीचा शोध घेत त्यास गजाआड केले. परंतु आरोपी संजय बर्डे याचा भाऊ दिलीप गोपीनाथ बर्डे हा पिडित कुटूंबीयांच्या घरी जाऊन माझ्या भावाला काही झाल्यास तुम्हाला मारून टाकेल, अशी धमकी देत असल्याचे सांगत टाकळीमिया शिवारातील आदिवासी बांधवांनी पोलिस ठाण्यात ठिया मांडला होता. पीडित कुटुंबाला संरक्षण मिळावे, जीवे मारण्याची धमकी देणार्‍यांवर गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी आंदोलकांनी केली. याप्रसंगी एकलव्य संघटनेचे राज्याचे प्रमुख शिवाजी ढवळे तसेच अनिल जाधव यांनी पोलिस प्रशासनाशी संवाद साधत पीडित कुटुंबीयांना न्याय देण्याची मागणी केली.