Breaking News

पोलिस मुलाकडून आईचा छळ; जमीन नावे करून देण्यासाठी दिली धमकी

बीड (प्रतिनिधी) जमीन नावे करून देण्याच्या मागणीसाठी मुलगा, सुन यांच्याकडून सातत्याने छळ केला जात आहे. मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली जात असुन या प्रकरणी पोलिस अधिक्षकांकडे तक्रार करूनही दखल घेत नसल्याने हताश झालेल्या आईने कालपासून जिल्हा कचेरीसमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. पाच दिवसात उपोषणाची दखल न घेतल्यास सहाव्या आत्मदहन करण्याचा इशारा आईने दिला आहे. विशेष म्हणजे उपोषणार्थी आई निवृत्त पोलिस पत्नी असुन पोेलिस दलात कर्मचारी असलेल्या मुलाक डूनच तिचा छळ होत असल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे.


बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंजना किसनराव पालवे (60) यांनी आजपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. सेवानिवृत्त पोलिस कर्मचारी किसनराव दगडूबा पालवे यांच्या त्या पत्नी आहेत. याप्रकरणात जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनात अंजना पालवे यांनी म्हटले आहे की, पती किसनराव पालवे यांना दोन वेळा अर्धांगवायुचा धक्का बसलेला असून त्यांची मानसिक परिस्थिती चांगली नाही. याचा गैरफायदा घेत पोलिस हवलदार विजयकुमार पालवे व त्यांची पत्नी मला माझ्या नावाने असलेली जमीन त्याच्या पत्नीच्या नावाने करून दे अशी मागणी करत आहे. जमीन नावे करत नसल्याने त्याच्याकडून मारहाण होत असल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे. वारंवार धमकीही दिली जात आहे. याप्रकरणी पोलिस अधिक्षकांकडे तक्रार देवूनही कोणीच दखल घेत नसल्याने उपोषण करत असल्याचे अंजना पालवे यांनी तक्रारीत म्हटले आहे. पाच दिवसात उपोषणाची दखल घेवून न्याय न मिळाल्यास सहाव्या दिवशी आत्मदहन करण्याचा इशारा अंजना पालवे यांनी दिला आहे.