Breaking News

माजी आमदार जयंत ससाणे यांचे निधन

अहमदनगर : काँग्रेसचे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष माजी आ. जयंत ससाणे यांचे सोमवारी पहाटे निधन झाले. ते 62 वर्षांचे होते. त्यांच्या पश्‍चात श्रीरामपूरच्या माजी नगराध्यक्षा राजश्री ससाणे, पुत्र व सध्याचे विद्यमान उप नगराध्यक्ष करण ससाणे, एक मुलगी, भाऊ, बहीण असा परिवार आहे. श्रीरामपूर मध्ये सोमवारी सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 
जयंत ससाणे हे गेल्या काही दिवसांपासून खूप आजारी होते. रविवारी रात्री त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने श्रीरामपूर मधील तज्ञ डॉक्टरांनी रात्रभर त्यांच्यावर उपचारांची शर्थ केली. मात्र सोमवारी पहाटे 5 च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. काँग्रेसचे निष्ठावान नेते होते. श्रीरामपूर विधानसभा मतदार संघात त्यांनी दोन वेळा प्रतिनिधीत्व केले होते. श्रीरामपूर चे नगराध्यक्ष पद त्यांनी 15 वर्षे भुषविले होते. तसेच शिर्डीच्या साईबाबा संस्थानचे ते तब्बल 7 वर्षे अध्यक्ष होते. संपूर्ण राज्यभर प्रसिध्द असलेल्या मुळा प्रवरा वीज सोसायटी चे देखील ते बराच काळ संचालक होते. तसेच सध्या काँग्रेसचे विद्यमान जिल्हाध्यक्ष म्हणून देखील जयंत ससाणे काम पाहात होते. शिर्डीमध्ये संस्थानचे अध्यक्ष म्हणून काम करतांना जयंत ससाणे यांनी भाविकांसाठी अनेक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याचे मोलाचे काम केले. विशेषत: साई आश्रम भक्त निवास, प्रसादालय,शिर्डीतील रस्त्यांकरिता भू संपादन, शिर्डी जवळील काकडी विमानतळाच्या उभारणीसाठी मोठ्या प्रमाणावर निधी उभा करण्यासारखी महत्वपूर्ण कामे ससाणे यांच्या अध्यक्षपदाच्या काळात झाली.
तसेच श्रीरामपूर नगरपालिकेत 15 वर्षे नगराध्यक्ष पद सांभाळत असतांना ससाणे यांनी राज्यातील एक सक्षम नगरपालिका अशी श्रीरामपूर पालिकेची ओळख निर्माण केली.श्रीरामपूरची पाणी योजना, रस्ते, रस्त्यांमधील दुभाजकांचे सुशोभीकरण,झोपडपट्टी मुक्ती योजना अशा महत्वा च्या योजना त्यांच्या नगराध्यक्ष पदाच्या काळात प्रभावी पणे राबविण्यात आल्या.गे ले काही दिवस ते आजारी असल्याने काही दिवसांपूर्वीच राज्याचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण व विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी श्रीरामपूर येथे त्यांच्या घरी जाऊन प्रकृतीची विचारपूस केली होती. सोमवारी सायंकाळी श्रीरामपूर मधील अमरधाम स्मशानभूमीत ससाणे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. नगर जिल्ह्याच्या राजकीय, सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.


काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयवंत ससाणे यांनी नगराध्यक्ष व 10 वर्षे आमदारकीच्या माध्यमातून सातत्याने गोरगरिबांच्या विकासासाठी काम केले. शिर्डी संस्थांनचे अध्यक्ष म्हणून काम करतांना त्यांना शिर्डीत अनेक अद्यावत सुविधा निर्माण करुन दिल्या. आंतरराष्ट्रीय पातळीवर शिर्डीचे नाव पोहचविले. श्रीरामपुर तालुक्याच्या सर्वांगीण विकासात त्यांचे मोठे योगदान राहिले. काँग्रेसचे निष्ठावंत सैनिक असलेल्या जयवंतराव अभ्यासू, मनमिळावू व कुशल संघटक होते. 
जयवंतरावांच्या निधनाने जिल्हा काँग्रेसची मोठी हानी झाली असून प्रामाणिक व तळमळीचा कुशल संघटक गमविला असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस नेते माजी महसूलमंत्री आ.बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे. नगर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष,माजी आ. जयवंत ससाणे यांनी शिर्डी संस्थानच्या अध्यक्षपदाच्या काळात मोठे काम उभे केले. देशभरात साई भक्तांना सुविधा देण्यासाठी आधुनिक सुधारण केल्या. प्रारदर्शक काम, संघटना त्मक काम, अभ्यासू व प्रामाणिकपणामुळे मोठा जनसंग्रह त्यांचा होता.त्यांच्या निधनाने जिल्हा काँग्रेसचे मोठे नुकसान झाले असून जिल्हा काँग्रेसचे प्रमुख शिलेदार अभ्यासू व विकासाभिमुख नेतृत्व हरपले असल्याची भावना आ. डॉ. सुधीर तांबे यांनी व्यक्त केली आहे. आमदार, साई संस्थांनचे अध्यक्ष, नगराध्यक्ष असे विविध पदे भूषवितांना जयवंतरावांनी आपल्या कामातून वेगळी ओळख निर्माण केली. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी जिल्ह्यात युवकांना मोठी ताकद दिली. साई संस्थान व श्रीरामपुर तालुक्याच्या विकासात त्यांचे योगदान कायम स्मरणात राहणार असून जयवंत ससाणे यांच्या निधनाने जिल्ह्यातील युवकांचे येष्ठ मार्गदर्शक हरपले असल्याची भावना प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी व्यक्त केली आहे.