Breaking News

कोल्हापूर महापालिकेच्या पर्यावरणपूरक गणेशोत्सवास सार्वजनिक मंडळांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

कोल्हापूर, दि. 07, सप्टेंबर - महापालिकेच्या मूर्तीदान आवाहनास सार्वजनिक मंडळांनी प्रतिसाद देत 547 मूर्ती पर्यावरणपूरक विसर्जित करण्यात आल्या. यामध्ये पंचगंगा नदी घाट (112), राजाराम बंधारा व बापट कॅम्प (48), कोटीतीर्थ तलाव व राजाराम तलाव (115) येथे 275 मूर्तीदान करण्यात आल्या. तसेच इराणी खाणीमध्ये 272 गणेशमूर्तींचे थेट विसर्जन करण्यात आले. महापालिकेच्या मूर्तीदान आवाहनास शहरातील अनेक मंडळांनी प्रतिसाद देऊन गणेशमूर्ती दान केल्याबद्दल व विसर्जन मिरवणूक शांततेने पार पाडल्याबद्दल महापालिकेच्यावतीने सर्व सार्वजनिक मंडळाच्या अध्यक्ष, प्रतिनिधींचे अभिनंदन करण्यात आले आहे. 
यावेळी 1367 गणेशमूर्त्या विसर्जनासाठी आल्या होत्या. यापैकी 275 मूर्त्या दान तर 272 मूर्त्या थेट इराणी खाणीमध्ये थेट विसर्जित करण्यात आल्या. पंचगंगा नदी व तलावामध्ये 820 मूर्त्या विसर्जित झाल्या. यामध्ये पंचगंगा नदी घाट 462, राजाराम बंधारा व बापट कॅम्प 190, राजाराम तलाव व कोटीतीर्थ तलाव 168 अशा एकूण 820 गणेशमूर्ती विसर्जित करण्यात आल्या. मागील वर्षी 1173 गणेशमूर्तीपैकी 236 मूर्त्या दान तर 258 मुर्त्या थेट इराणी खाणीमध्ये विसर्जित करण्यात आल्या होत्या.
दरम्यान महापालिकेच्यावतीने अनंत चतुर्दशी निमित्त सार्वजनिक गणेश विर्सजनाचे मिरवणुकीत सहभागी होणार्‍या सार्वजनिक संस्था, तरुण मंडळे व तालीम संस्थांचे अध्यक्षांना पापाची तिकटी येथील मंडपामध्ये महापौर सौ. हसिना फरास, आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, उपमहापौर अर्जुन माने, स्थायी समिती सभापती डॉ. संदीप नेजदार, महिला व बालकल्याण समिती सभापती सौ. वहिदा सौदागर, सभागृह नेता प्रविण केसरकर, प्रभाग समिती सभापती सौ. प्रतिक्षा पाटील, सौ. छाया पोवार, अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, नगरसेवक/नगरसेविका, अधिकारी यांच्या हस्ते 344 मंडळांना श्रीफळ, पान, सुपारी अर्पण करण्यात आले. तसेच वृक्षारोपणाचे महत्व समजणेकामी सार्वजनिक गणेश मंडळांना रोपे भेट देण्यात आली.
महापालिकेकडून सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली होती. यामध्ये रस्त्यांची डागडूजी करण्यात आली होती. अतिक्रमण व अडथळे हटविण्यात आले होते. तसेच विसर्जन मार्गावर लाकडी व मजबूत बांबुचे व आवश्यकतेनुसार लोखंडी बॅरिकेटस् व वॉच टॉवर उभे करण्यात आले होते. मिरवणूक मार्ग व विसर्जन ठिकाणी लाईटची व्यवस्था करण्यात आली होती. पंचगंगा नदी घाट, राजाराम तलाव, कोटीतीर्थ तलाव, पंचगंगा नदी बापट कॅम्प येथे दान करण्यात येणार्‍या गणेश मूर्ती ठेवणेसाठी मंडप उभारण्यात आले होते. इराणी व बाजूच्या खणीभोवती संरक्षणासाठी बॅरेकेटींग, वॉच टॉवर व पोलिस पेंडल उभे करण्यात आले होते. मिरवणुक मार्ग व मुख्य चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसविलेले आहेत. आरोग्य विभागाकडून विर्सजन मिरवणुक मार्ग, विसर्जन स्थळांची स्वच्छता करण्यात आली होती. तसेच वैद्यकिय पथकनेमणेत आले होते. विसर्जन मार्गावरील धोकादायक इमारतीभोवती बॅरेकेटस् उभारण्यात आले होते. तसेच या इमारतीजवळ धोकादायक असलेचे फलक लावणेत आले होते. अग्निशमन विभागामार्फत पंचगंगा घाट, इराणी खण, कोटीतीर्थ तलाव, राजाराम तलाव व राजाराम बंधारा या विसर्जन ठिकाणी अग्निशमन दलाचे दक्षता पथक, सुरक्षा गार्ड आवश्यक त्या साधनसामुग्रीसह तैनात ठेवणेची व्यवस्था करण्यात आली होती. यासाठी पवडी विभागाचे 250 कर्मचारी, आरोग्य व ड्रेनेज विभागाचे 80 व इतर विभागाचे कर्मचारी, ट्रॅक्टर-35, डंपर-6 व जे.सी.बी.-5 ची अशी यंत्रणा तैनात करण्यात आली होती.
गणपती विसर्जनावेळी बुडत असलेल्या चार व्यक्तिंना अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्तीचे प्रयत्न करुन वाचविले. यामध्ये पंचगंगा नदी घाट येथे दुपारी 4.40 वाजता ऋषिकेश सांगवडे रा.शनिवार पेठ व एका तरुणास बुडत असताना वाचविले. राजाराम बंधारा येथे सायं.6.10 वाजता शामराव परीट (वय 52) रा. गोळीबार मैदान कसबा बावडा राजाराम तलाव येथे दुपारी 1.15 वाजता सम्राट जनरकर रा.मुडशिंगी यांना बुडत असताना वाचविले. मुख्य अग्निशमन अधिकारी रणजित चिले यांचे मार्गदशाखाली स्थानक अधिकारी रविंद्र ठोबरे, दस्तगीर मुल्ला, तांडेल सुनिल वाईगडे, खानु पुजारी, फायरमन ओंकार खेडकर, अभिजीत सरनाईक, मधुकर जाधव, प्रमोद मोरे, मंदार कांदळकर, सुरेंद्र जगदाळे, वामन चौरे, हिंदूराव पाटील, उदय शिंदे, अभय कोळी, गणेश लकडे, नितेश शिणगारे, जीवरक्षक प्रशांत घोरपडे, विक्रम पोवार, दौलत रावराणे यांनी वाचविणेसाठी प्रयत्न केले.
आरोग्य विभागाकडून विर्सजन ठिकाणी दान केलेले 60 टन निर्माल्य गोळा करुन वाशी येथे खत निर्मितीसाठी जमा करण्यात आले. अवनि व एकटी संस्थेमार्फ़त निर्माल्यांचे विलगीकरण करून खत करण्यात येत आहे. मिरवणूक संपल्यानंतर मिरवणूक मार्ग स्वच्छ करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.