Breaking News

खूनाला फोडली वाचा; श्रीगोंदे पोलिसांची लक्षणीय कामगिरी


बावीस वर्षांनी भाऊ जन्मला,परंतु तोच आता संपत्तीत वाटेकरी होईल म्हणून सख्ख्या भावाने बायकोच्या मदतीने झोपेत असलेल्या पाच वर्षांच्या चिमुकल्या बालू उर्फ वैभव पारखे याचे पाय धरले. त्याच्या डोक्यात कुऱ्हाड घालून खून केला. 
ही निर्दयी घटना करण्यास सांगणाऱ्या मुख्य आरोपीच्या सासुसह तिघांना पोलिसांनी अटक केली. श्रीगोंदयाचे पोलीस उपनिरीक्षक महावीर जाधव यांनी आपले कौशल्य दाखवीत केवळ तीन महिने घटनेचा तपास करून हा गुन्हा उघडकीस आणला. 

याप्रकरणी पोलिसांनी शांतीलाल बापू पारखे ( वय २७), काजल शांतीलाल पारखे (वय २२) व सुनीता अंकुश तांबे (शिरूर) यांना अटक केली आहे. श्रीगोंदे शहराजवळील भिंगाण येथून बालु बापु पारखे (वय ५ वर्ष ) हा १३ सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजल्यापासून बेपत्ता होता. घरच्या लोकांनी त्याचा शोध घेतला मात्र तो न सापडल्याने श्रीगोंदे पोलिसांनी या मुलाच्या अपहरणाचा गुन्हा दाखल केला. घरापुढे खेळत असताना बाल्या अचानक गायब झाला असल्याची तक्रार त्याच्या पालकांनी दिली. त्याचे आई-वडील शेती करतात. तक्रार आल्यानंतर सकाळपासून त्या परिसरात पोलिसांनी लोकांच्या मदतीने शोधमोहिम राबवली, मात्र त्यांना बाल्याचा ठावठिकाणा लागला नाही. दुपारी श्वानपथकही पाचारण करण्यात आले मात्र मार्ग सापडला नाही. सोशल मिडीयातूनही त्याविषयी पोस्ट टाकण्यात आल्या असून, याप्रकरणी काही लोकांची पोलीस चौकशी सुरु आहे. याप्रकरणी अज्ञात लोकांच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला.

पोलीस उपनिरीक्षक महावीर जाधव व पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी आपल्या तपासाची चक्रे वेगळ्याच पद्धतीने फीरवली. त्यांनी आता घरच्या लोकांवर आपले सर्व लक्ष केंद्रित केले आणि काही दिवसात त्यांना त्यांच्या घराजवळ बालू याचा मृतदेह मिळून आला. आरोपीनी अतिशय सफाईदारपणे ही घटना केल्याने पोलिसही देखील चक्रावले. मयत बालू याच्या घरी आई वडील, थोरला भाऊ, भावजय व सहा महिन्यांचा पुतण्या असे कुटुंब आहे. पोलिसांना संपत्तीच्या कारणावरून कदाचित चिमुकल्याला संपविले असेल अशी शंका आली होतीच. त्यांनी  घरातील लोकांचे मोबाईल लोकेशन तपासण्यास सुरुवात केली. मात्र तरीही तपास लागत नव्हता. मात्र शेवटी पोलीस उपनिरक्षक महावीर जाधव यांनी शांतपणे या घटनेचा सर्व उलगडा करीत गुन्हा उघड केला.

आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार, मयत बालू हा आरोपी शांतीलाल याच्यापेक्षा बावीस वर्षांनी लहान होता. मात्र तो संपत्तीत भागीदार होणार असल्याने त्याची सासू सुनीता तांबे हिने त्याचा खून करण्याचा अघोरी सल्ला दिला. शांतीलाल व त्याची पत्नी काजल यांनी बालू दुपारी झोपला असता, काजल हीने त्याचे पाय पकडले, आणि शांतीलाल याने बालूच्या डोक्यात कुऱ्हाड घालून निर्दयपणे खून केला. रक्ताने माखलेले कपडे जाळून टाकून घराच्या जवळच वेड्या बाभळी असणाऱ्या ठिकाणी एका खड्यात त्याचा मृतदेह टाकून दिला.परंतु खुनाला वाचा फुटली आणि आरोपी गजाआड झाले.