Breaking News

संघर्ष हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, त्यामुळे मी लढणारच!-अॅड ढाकणे


पाथर्डी/श. प्रतिनिधी/- प्रस्थापित आणि विस्थांपितांमधील संघर्ष ही नगर जिल्ह्याची ओळख आहे. संघर्षाची देणगी मला अनुवांशिकतेने लाभली असल्याने, मी लोकसभा अथवा विधानसभेची निवडणूक लढणारच !असे ठाम वक्तव्य केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अॅड.प्रताप ढाकणे यांनी केले.
पाथर्डी तालुक्यातील खरवंडी कासार येथे आयोजीत केलेल्या कार्यकर्त्यांच्या सहविचार बैठकीत अॅड.ढाकणे बोलत होते.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सितारामबापू बोरुडे, राजेंद्र जगताप, मुंगुसवाड्याचे उपसरपंच राजेंद्र हिंगे, किरण खेडकर, आर.आर. ढाकणे यांच्यासह खरवंडी पंचक्रोशीतील कार्यकर्ते उपस्थित होते. या दरम्यान स्नेहभोजनाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता.

कार्यकर्त्यांचे मनोगत जाणून घेण्याच्या हेतूने आयोजीत करण्यात आलेल्या या कार्यक्रमात पुढे बोलताना ढाकणे म्हणाले की , ही माझी वैचारिक लढाई असून आपण सर्वजण हीच माझी ताकद आहे. यासाठी हा निर्णय घेण्यापूर्वी तुमचे मत जाणून घेण्याची माझी इच्छा आहे. आजवर इतरांसाठी खस्ता खाल्ल्या, आता माझ्या अस्तित्वासाठी ही लढाई मी लढणार आहे. त्यामुळे तुम्हीच हा निर्णय द्या की, विधानसभा किंवा लोकसभा यापैकी मी कोणती निवडणूक लढवायची..?

यावेळी ढाकणे यांनी कोणत्याही परिस्थितीत कोणती का होईना, परंतु निवडणूक लढवायचीच असा चंग बांधला असल्याचे त्यांच्या देहबोलीवरुन जाणवत होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेससमोर घुले की ढाकणे? असा पेचप्रसंग निर्माण होणार आहे. जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीत ढाकणेंच्या सौभाग्यवतींना डावलण्यात आले होते. त्यामुळे ढाकणे नाराज आहेत. याच उद्विग्नतेतून त्यांनी आता दंड थोपटले असून प्रसंगी ते कुठलाही निर्णय घेऊ शकता.