Breaking News

पाथर्डीत स्वच्छतेच्या अवडंबराला, फुटू लागली वाचा!


पाथर्डी/श. प्रतिनिधी/- पाथर्डी शहरातील रामगिरीबाबा टेकडीच्या पायथ्यानजीक असलेल्या सार्वजनिक शौचालयाची व परिसराची स्वच्छता करण्यात यावी, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेविका सविता डोमकावळे यांनी, पालिकेच्या मुख्याधिकारी तसेच नगराध्यक्षांना निवेदन सादर केले आहे. १२ फेब्रुवारीपर्यंत निवेदनात सुचविण्यात आलेल्या ठिकाणांची स्वच्छता न झाल्यास, पालिकेच्या दालनात बैठा सत्याग्रह करण्याचा इशारा दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, शहराच्या पूर्वेकडील भागात असलेल्या पाण्याच्या टाकीजवळील सार्वजनिक शौचालय तसेच परिसरात सर्वत्र कचरा पसरल्याने हा परिसर घाणीचे आगार बनला आहे. पालिका प्रशासनाकडून प्रसिद्धीचे केवळ स्तोम माजविण्यात येत आहे. येथील घाणीमुळे तेच सिद्ध होत आहे. एकाही शौचालयाला दरवाजा नसून एकही शौचकूप सुस्थितीत नाही. सांडपाण्याच्या हौदाला गळती लागली असल्याने त्यात पाणीच शिल्लक राहात नाही. पाथर्डी नगर पालिकेची स्वच्छता फक्त कागदोपत्री तसेच फ्लेक्सबोर्ड व रंगरंगोटी करण्याइतपत मर्यादित आहे. स्वच्छता अभियानाचे अस्तित्व रस्ते व सार्वजनिक ठिकाणांवर दिसून येत नाही. हे अभियान या प्रभागातील लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता परस्पर चालवलेले आहे.

१२ फेब्रुवारीपर्यंत शौचालयांची डागडूजी व परिसराची स्वच्छता न झाल्यास प्रभाग क्र.३ मधील रहिवाशांच्या वतीने नगरपालिकेच्या दालनात बैठा सत्याग्रह करण्याचा इशारा या प्रभागाच्या नगरसेविका सविता डोमकावळे यांनी दिला असून, पुढील परिणामांना पालिकेचे प्रशासन जबाबदार राहील असे सूचित करण्यात आले आहे.

चौकट:-रोज सकाळी सकाळी भुपाळी गायनाप्रमाणे स्वच्छता अभियानाची जाहिरातबाजी करत कचरा गाडी तिच्या येण्याची वर्दी देते. कधी सकाळी तर कधी दुपारी अशी अनियमीत वेळ असल्याने बहुतांशी नोकरदार कामावर जातात. स्वच्छतेच्या ठेक्यावर लाखो रुपये खर्च करण्यात येतो. परंतु ज्या भिंतींवर स्वच्छतेविषयी प्रबोधनात्मक जाहिराती रंगविण्यात आल्या आहेत. त्याच भिंतींच्या तळाशी असणाऱ्या गटारी कचऱ्याने तुंबल्या असून परिसरात दुर्गंधी सुटली आहे. स्वच्छतेवर महिन्याकाठी लाखो रुपये खर्चापोटी दाखवले जात असले तरी, महापुरुषांच्या पुतळ्यांची व परिसराची स्वच्छता करण्याची वेळ दस्तुरखुद्द नगरसेवकांवर येते. ते कर्तव्यभावनेतून हे काम करीत असले तरी स्वच्छता अभियानाचे अवडंबर आणि प्रत्यक्षातील स्वच्छता यात फार मोठा विरोधाभास आहे.