Breaking News

पुतळा जाळण्यास संमती देणारी आमची आई कशी? आशुतोष काळे यांचा सवाल


विरोधक आम्हाला त्यांचा मुलगा मानतात. पण मग मातेनेच मुलाचा पुतळा जाळण्यास संमती देणारी आमची आई कशी असू शकेल, असा आ. स्नेहलता कोल्हे यांना अंतर्मुख करणारा सवाल युवानेते आशुतोष काळे यांनी उपस्थित केला.

हल्लाबोल आंदोलन जाहीरसभेत झालेल्या चिखलफेकीनंतर कोपरगाव शहरात भाजपा आणि राष्ट्रवादी कार्यकर्ते एकमेकांत भिडले. दोन्हीही पक्षांकडून परस्परांविरुद्ध फिर्यादी दाखल झाल्या. त्यानंतर दोन्हीही पक्षाचे नेते आपआपली बाजू मांडत आहेत. या पार्श्वभूमीवर आशुतोष काळेंनी पत्रकार परिष घेऊन आ. कोल्हेंना प्रत्युत्तर दिले. दरम्यान, आ. कोल्हेंनी शेतकरी संप फोडल्याच्या आरोपाबाबत आपण आजही ठाम असल्याचे ते म्हणाले. 

काळे म्हणाले, की स्व. काळेंच्या अपेक्षा माझ्या वडिलांनी {माजी आ. अशोक काळे} ३५ वर्षे तालुक्याचे वाटोळे करणाऱ्यांचा दोनदा पराभव करून केल्या आहेत. आता आजोबांची इच्छा २०१९ च्या निवडणुकीत विरोधकांचा पराभव करुन मी पूर्ण करणार आहे. आ. कोल्हे काकू यांना गाजराची दिलेल्या उपमेत कुठेही अश्लिलता नाही. सरकारला जनतेनेच गाजर म्हटले आहे. उपहासाचा हा एक भाग आहे. अश्लिल वक्तव्य करणाऱ्या श्रीपाद छिंदमचा पुतळा जाळायचे सोडून तालुक्यातील शिवभक्तांचे लक्ष विचलित व्हावे, म्हणून माझा पुतळा जाळण्याचा कट रचण्यात आला. अर्थात माझ्या कार्यकर्त्यांनी विरोधकांचा तो कट उधळून लावला. महिलांचा कुठेही विनयभंग केला नसतानाही खोटी फिर्याद दाखल करण्यात आली. असले प्रकार करणारे कार्यकर्ते कुणाच्या पाठिशी आहेत, हेदेखील सर्वांना माहित आहे. असा प्रकार झाला असता माझ्या कार्यकर्त्यांना कदापिही पाठीशी घातले नसते.

निळवंडेचे पाणी आणण्यास आमचा विरोध नाही. आणले तरी लोकप्रतिनिधींचा त्यात फायदा आहे. नाहीच आणले तर मी नांदूर मध्मेश्वरचे पाणी आणल्याशिवाय राहणार नाही. पाचशे कोटी विकासकामांचा लोकप्रतिनिधींचा दावा खोटा आहे. कामे कुठेही दिसत नाहीत.