Breaking News

दखल - शेतकर्‍यांच्या जखमांवर मीठ!

अस्मानी व सुलतानी अशा दोन्ही प्रकारच्या संकटांमुळं शेतकरी अडचणीत येत असतो. अशा वेळी त्याला मदतीचा हात द्यायचा असतो. धीर द्यायचा असतो. परिस्थितीशी लढण्याचं बळ त्याला द्यायचं असतं; परंतु सरकार शेतकर्‍यांना मदतीचा हात देण्याऐवजी एकतर त्याच्यावर उपकार केल्याचा आव तरी आणला जातो किंवा त्याच्या भावनाशी खेळ केला जातो. त्याच्या जखमांवर मीठ चोळलं जातं. मागच्या वर्षी अवकाळी पाऊस झाला, गारपीट झाली, तेव्हा शेतकर्‍यांना जी मदत देण्यात आली, त्यामुळं शेतकर्‍यांनी खूश होण्याऐवजी सरकारचा निषेध केला. 
शेतकर्‍यांना जे धनादेश देण्यात आले, त्यावर 24 व 29 रुपयांची रक्कम टाकण्यात आली होती! त्यामुळं शेतकर्‍यांनी ही रक्कम नाकारली. मदतीपेक्षा शेतकर्‍यांना बँक ांत खाती खोलण्यास जास्त पैसे लागणार होते! अशा वेळी शेतकर्‍यांचं संतप्त होणं स्वाभावीक आहे. अडचणीत आलेल्या शेतकर्‍यांना अशा वेळी सहानुभूतीनं वागविणं आवश्यक असतं. त्यांच्या भावनांना ठेच पोचणार नाही, याची दखल घेणं आवश्यक असतं; परंतु सरकार मात्र त्यांना अपमानास्पद वागणूक देत आहे. त्याचाच प्रत्यय आता गारपीटग्रस्तांना आला आहे. राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळं 19 जिल्ह्यातील शेतकर्‍यांचं नुकसान झालं. मराठवाडयातील उमरगा तालुक्यातील नुकसानी संदर्भातील पंचनामे वादाच्या भोवर्‍यात अडकले आहेत. पोलीस ठाण्यात गुन्हेगाराच्या हातात पाटी देऊन ज्या पद्धतीनं फोटो काढले जातात, त्याच पद्धतीने शेतकर्‍यांच्या हातात पाटी देऊन त्यांचे फोटो काढण्यात आले आहेत. गारपिटीमुळं विदर्भ, मराठवाडा तसंच उत्तर महाराष्ट्रातील काही भागांत शेतीचं तसंच काढणी झालेल्या मालाचं नुकसान झालं आहे. 

या नुकसानीबाबत कृषी व महसूल विभागाच्या अधिकार्‍यांमार्फत पंचनामे सुरू असून उमरगा तालुक्यातील पंचनामे वादग्रस्त ठरले आहेत. शेतकर्‍यांच्या हातात त्यांच्या नावाच्या पाटया दिला जात असून त्यावर नुकसानाची माहिती असते. शेतात त्यांचं छायाचित्र काढलं जात आहे. पोलीस ठाण्यात गुन्हेगाराचं जशी छायाचित्रं काढली जातात, त्याच पद्धतीनं शेतक र्‍यांची छायाचित्रं काढली जात आहेत. पारदर्शक कारभारासाठी हा खटाटोप असला, तरी ही पद्धत संतापजनक असल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थ देत आहेत. याबाबत विधान प रिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीदेखील टि्वटरवरुन सरकारवर टीका केली. मराठवाडयात गारपिटीच्या नुकसानीचे अत्यंत वाईट पद्धतीनं पंचनामे सुरू आहेत. शेतकर्‍यांच्या गळ्यात पाटी लटकवली जाते. त्या पाटीवर शेतकर्‍याबाबत माहिती दिलेली असते. त्यावर त्याचं नाव, नुकसान लिहिलेलं असतं. मुख्यमंत्री महोदय, हे शेतकरी चोर आहे का, अशा पद्धतीनं शेतकर्‍यांची थट्टा करणं बंद करा, असं त्यांनी टि्वटमध्ये म्हटलं आहे. मराठवाडा, विदर्भामध्ये गारपिटीनं शेतकर्‍यांचं कोटयवधी रुपयांचं नुकसान झालं. शेतकर्‍यांवर अस्मानी संकट आलेलं असताना शेतकर्‍यांना सरकार कोणतीच भरपाई देत नसल्याचा आरोप त्यांनी केला.अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळं 19 जिल्ह्यातील सुमारे 102 तालुक्यांमधील तीन हजार 724 गावांमधील तीन लाख हेक्टर क्षेत्र बाधित झालं आहे. गहू, हरभरा, ज्वारी, मका, कांदा व रब्बी हंगामामधील फळपिकांना गारपिटीचा सर्वांधिक फटका बसला आहे. 

गारपीटग्रस्त शेतकर्‍यांच्या अनुदान वाटपामध्ये सुरू असलेलं घोळसत्र काही संपत नाही. लातूर जिल्ह्यामध्ये तर गारपीटगˆस्तांना देण्यात आलेल्या अनुदान वाटपात सुमारे 30 कोटींचा घोळ झाल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला आहे. सोनखेड येथील शेतकरी जगन्नाथ यांनी हा आरोप केला आहे. अहमदपूर तालुक्यातील किनगाव येथील तलाठी मधुकर क्षीरसागर व मंडलाधिकारी ए.आर. नागदरे यांनी गारपीट अनुदान वाटपात सुमारे 30 कोटींचा घोळ केला असून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, अशी तक्रार जगन्नाथ यांनी जिल्हाधिकार्‍यांकडं केली आहे. 

अहमदपूर तालुक्यात 2014-15 व सन 2015-16 मध्ये गारपीट झाली होती. या गारपिटीमध्ये शेतकर्‍यांचं मोठं नुकसान झालं होतं. या गारपीटगˆस्त शेतकर्‍यांना मदत देताना तलाठी व मंडलाधिकार्‍यांनी अनेक शेतकर्‍यांची खाती बदलली. या शेतक र्‍यांना क्षेत्रापेक्षा जास्त रकमेचे वाटप केले. या अधिकार्‍यांनी कोरडवाहू क्षेत्रही बागायती दाखवलं. अधिकार्‍यांच्या या घोटाळ्यामुळं अनेक पात्र शेतकरी आजही लाभापासून वंचित आहेत. त्यामुळं या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी जगन्नाथ यांनी लातूर आणि पुण्याच्या जिल्हाधिकार्‍यांकडं करण्यात आली आहे.