Breaking News

दहशतवाद्यांसोबत लढण्यासाठी संघाला काठी देऊन सीमेवर पाठवा

पंढरपूर/प्रतिनिधी : केंद्र सरकारने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांना हाफ पँट-शर्ट घालून सोबतच काठी देऊन देशाच्या सीमेवर दहशतवाद्यांचा सामना करण्यासाठी पाठवावे, म्हणजे भागवतांच्या म्हणण्यात किती तथ्य आहे ते देशाला समजेल, अशी टीका राष्ट्रवादी काँगे्रसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी रविवारी केली. ते पंढरपूर येथे आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात पवार बोलत होते. पवारांनी सरसंघचालक मोहन भागवत, हिरे व्यापारी निरव मोदी, संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे यांच्यासह राज्य आणि केंद्र सरकारवर जोरदार टीकेची झोड उठवली आहे.


राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सेवक तीन दिवसात सीमेचं रक्षण करायला सज्ज होतील. या मोहन भागवतांच्या वक्तव्याचा समाचार घेताना पवार म्हणाले, माझी केंद्र शासन आणि केंद्रीय गृहमंत्र्यांना विनंती आहे की, भागवत म्हणतात त्याप्रमाणे देशाच्या सीमेचे रक्षण करण्यासाठी भागवतांचे सैन्य काठ्या घेऊन सीमेवर पाठवून द्यावे म्हणजे भागवतांच्या बोलण्यात किती तथ्य आहे ते लोकांना कळेल. भागवत यांचे हे वक्तव्य देशाच्या सीमेचे रक्षण करणार्‍या सैनिकांची अप्रतिष्ठा करणारे आहे, अशी टिपण्णी पवार यांनी केली. पंजाब नॅशनल बँकेला 11 हजार कोटीला गंडा घालणार्‍या निरव मोदी यांचे खापर सत्ताधारी युपीएच्या डोक्यावर फोडत असल्याच्या वृत्ताचा समाचार घेताना पवार म्हणाले, ‘देशातील एक ा जबाबदार व्यक्तीने निरव मोदी हे अशा पद्धतीने घोटाळा करीत आहेत अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाला लेखी स्वरूपात दिलेली होती मात्र ही बाब पंतप्रधान कार्यालयाने गांभीर्याने घेतली नाही. आणि देशाची लूट झाली. या प्रकरणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले गेले का अशी साशंकता येते. भिडे आणि एकबोटे यांचे पाय धरण्यात धन्यता मानणारे लोक सत्तेत बसले असल्याने त्यांच्यावर कितपत कारवाई होईल याबाबत शंका आहे. शेतकर्‍यांना नागवले जात असून, त्यांना न्याय मिळत नसल्याने आत्महत्या करावीशी वाटते, त्यामुळे आत्महत्येच्या संख्येत वाढ होत असल्याची खंत पवार यांनी यावेळी व्यक्त केली.