Breaking News

राष्ट्रीय नेतृत्व करणार्‍या पूजा निकम यांचा गौरव


प्रजासत्ताक दिनी राजपथवरिल संचालनात देशाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाल्यावर, ज्या भूमीने मला घडविले ती शेवगावची मातृभूमी माझ्या डोळ्यासमोर उभी राहिली. ध्येयपुर्तीचा आनंद होताच त्याबरोबरच शेवगावचे नाव राष्ट्रीय पातळीवर अभिमानाने उंचावल्याचा सर्वाधिक आनंद झाला, अशा कृतज्ञतेच्या भावना एनसीसीच्या सिनिअर अंडर ऑफिसर पूजा निकम यांनी व्यक्त केल्या. शेवगाव येथील न्यू आर्टस् कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स महाविद्यालयात राजपथावरील संचालनात राष्ट्रीय नेतृत्व करणार्‍या पूजा निकम यांचा गौरव करण्यात आला. त्या वेळी सत्काराला उत्तर देताना पूजा बोलत होत्या. शहरातील आंबेडकर चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून पूजा निकम यांची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी महाविद्यालयामध्ये पूजा निकम यांचेसह तसेच राजपथावरील संचलनात यंदा सहभागी झालेले छात्रसैनिक शैलेश पाथरकर, ऋषिकेश चव्हाण, गत वर्षीची राजपथावरील संचलनाची महाराष्ट्र कमांडर वेदिका आरे, आकाश धनवडे यांचा सत्कार पैठणचे विभागीय पोलिस अधिकारी स्वप्निल राठोड, प्राचार्य डॉ. लक्ष्मण मतकर, ज्येष्ठ पत्रकार अविनाश मंत्री यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी राठोड म्हणाले की, राजपथावर देशाचे नेतृत्व करीत संचलन करीत तिरंग्याला सलामी देणे ही अत्यंत कठिण बाब होती. पूजा निकम हिचे यश शेवगाव व महाराष्ट्राच्या दृष्टिने अभिमानाची बाब आहे. पूजाच्या यशाच्या कौतुकासाठी तिचे वडिल भीमराज निकम, आई मुक्ताबाई निकम, आजोबा सर्जेराव निकम, आजी विमल निकम, माणिक शेंडकर, बाळासाहेब फरताळे, लक्ष्मण खरात आदी उपस्थित होते. यावेळी सूत्रसंचालन डॉ. अनिता आढाव यांनी केले. तर आभार प्रदर्शन बापूसाहेब फुंदे यांनी मानले.