Breaking News

छत्रपती शिवरायांमुळे मानसिक गुलामगिरी नष्ट : पो. नि. कटके


आश्वी : प्रतिनिधी ;- राजमाता जिजाऊ माँ साहेबांनी शिवरायांचे मन, मनगट व मस्तिष्क स्वराज्य निर्मितीच्या विचाराने मजबूत केले. त्यामुळेच छत्रपती शिवरायांमुळे समाजातील आर्थिक, धार्मिक व मानसिक गुलामगिरी नष्ट झाली, असे प्रतिपादन आश्वी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांनी केले.
संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथे आयोजित शिवजयंती सोहळ्यात ते बोलत होते. याप्रसंगी सरपंच, उपसरपंच विविध क्षेत्रातील राजकीय, सामाजिक व शासकीय मान्यवर, विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.

पोलिस निरिक्षक कटके म्हणाले, छत्रपती शिवराय नावाचे रसायन हे वाचन केल्याशिवाय समाजणार नाही. त्यामुळे तरुणांनी इतिहासाचे वाचन करणे अत्यंत गरजेचे आहे. कारण शिवरायांनी कोणत्याही जातीधर्माचा द्वेश न करता सर्वांना बरोबर घेऊन हे हिंदवी स्वराज्य निर्माण केले आहे. छत्रपतीचा वैचारिक वारसा जोपासतांना तरुणांनी येथील महिला व मुलींना संरक्षण दिले तरच आपण शिवरायांच्या विचाराचे खरे अनुयायी होऊ. स्पर्धेच्या युगात ढोंगी विचार अंगिकारण्याऐवजी तरुणांनी प्रशासनात जावे. गावामध्ये स्पर्धा परिक्षा अभ्यासिका सुरु करा, असे आवाहन करत पो. नि. कटके यांनी यासाठी स्वत: पुढाकार घेत १० हजार रुपये मदत जाहीर केली. याप्रसंगी कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या लेझीम व झांज पथक मिरवणुकीचे कटके यांनी कौतूक केले.