Breaking News

सैलानी यात्रेतील मनोरुग्णांना योग्य ते उपचार द्या! महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

जिल्ह्यातील सुप्रसिध्द सैलानी बाबा यात्रेदरम्यान मोठ्या प्रमाणात मनोरुग्ण येत असतात. या मनोरुग्णांशी अत्यंत हिणकस पध्दतीने व्यवहार केला जातो. त्यांना साखळदंडाने बांधून ठेवले जाते. हा सरळ-सरळ नियमभंग आहे. त्यामुळे त्याला तात्काळ प्रतिबंध करावा, अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या वतीने मंगळवार 20 फेब्रुवारी 2018 रोजी जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली.


महाराष्ट्र अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील अंनिसच्या पदाधिकार्यांनी मंगळवारी थेट सैलानी दर्गाह परिसरात जाऊन परिसराची पाहणी केली. या ठिकाणी येणार्या मनोरुग्णांना किती वाईट वागणूक दिली जाते, याची सविस्तर माहिती या शिष्टमंडळाने घेतली. त्यानंतर बुलडाण्यामध्ये अपर जिल्हाधिकारी दुबे यांना निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की, सैलानी यात्रेनिमित्ताने संपूर्ण देशभरातून मनोरुग्ण या ठिकाणी येत असतात. मात्र या ठिकाणी त्यांच्यावर उपचार करण्यासाठी उपस्थित असलेले भोंदूबाबा अत्यंत अघोरी पध्दतीने येथील मनोरुग्णांची छळवणूक करतात. त्यांना साखळदंडाने बांधून ठेवणे किंवा इतर अनेक प्रकार करतात. हे सर्व कायद्याच्या विरोधात आहे. येथे येणार्‍या मनोरुग्णांचे मानसिक रोग दूर करण्यासाठी खर्या अर्थाने येथे मनोरुग्णालय स्थापन करण्यात यावे. हे जोपर्यंत शक्य नाही, तोपर्यंत मानसोपचार तज्ज्ञ आणून त्या ठिकाणी एक स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात यावा. याशिवाय या यात्रा काळात आलेले भोंदूबाबा भानामती, करणी यासारख्या समस्या दूर करण्याचा दावा करतात. हे अघोरी प्रकार थांबविण्यात यावेत. तसेच या ठिकाणी होणारे मनोरंजनाचे प्रकार तात्काळ बंद करावेत, अशा मागण्या या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. निवेदन देते वेळी महाराष्ट्र अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अ विनाश पाटील यांच्यासमवेत जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. संतोष आंबेकर, जिल्हा कार्याध्यक्ष प्रदीप हिवाळे, सचिव पंजाबराव गायकवाड, उपाध्यक्ष न. ह. पठाण, नरेंद्र लांजेवार, गणेश सोनोने, सुरेश साबळे, शाहीर डी. आर. इंगळे, जिल्हा युवा कार्यवाह दीपाली सुसर, प्रा. नीलेश बंगाळे, पत्रकार संजय जाधव, युवराज वाघ, संतोष लोखंडे आदि उपस्थित होते. ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येला 20 फेब्रुवारी 2018 रोजी तीन वर्षे पूर्ण झाले. मात्र त्यांच्या मारेकर्यांना अद्यापही अटक करण्यात आलेली नाही. या घटनेचा निषेध करणारे एक पत्र महाराष्ट्र अंनिसच्या पदाधिकार्यांनी यावेळी अपर जिल्हाधिकारी दुबे यांना दिले. पानसरे यांच्या मारेकर्यांना तात्काळ अटक करावी. अद्यापही हे मारेकरी फरार असल्यामुळे न्यायालयदेखील या प्रकरणी संतप्त झाल्याचे या वेळी सांगण्यात आले. त्यानंतर अंनिसच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक शशीकुमार मीणा यांना सादर केले व त्यांच्याशी विविध मुद्द्यांवर चर्चा केली.