Breaking News

दखल - भाजपचं भजीपुराण!

खरं तर पक्षांचा व भज्यांचा काही संबंध नसतो. भुकेल्या कार्यकर्त्यांना कधी कधी भजी खाऊ घालण्याइतपतच पक्षांचा व भज्यांचा संबंध येत असतो; परंतु नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून चहा, भज्यांना फारच महत्त्व आलं आहे. चहा विकून मोदी पंतप्रधान झाले आहेत, असं सांगितलंजात असलं, तरी त्यावर बर्‍याच जणांचा विश्‍वास नाही. फक्त सामान्य व्यक्तीही त्याच्या कर्तृत्त्वाच्या जोरावर लोकशाहीत पंतप्रधानपदी पोचू शकते, हा त्याचा मतितार्थ. तेवढा आदर्श घेण्यापुरता घेतलात, तरी पुरे! मस्त पावसाळी धुंद वातावरण आणि त्यात गरम गरम तळली जाणारी कांदा भजी कुणाच्या तोंडाला पाणी आणणार नाहीत; परंतु इथं देशाच्या पंतप्रधानांचा निषेध करण्यासाठी बेरोजगार युवक भजी तळण्याचं आंदोलन हाती घेत असतील, तर त्याची गंभीरपणे दखल घ्यायला हवी.

लोकसभा निवडणुकीच्या अगोदर बेसुमार स्वप्नं दाखवायची, त्याच्या जोरावर मतं विकून सत्ता मिळवायची आणि सत्तेत आलं, की ती स्वप्न पूर्ण करता येत नसतील, तर मग त्याला फाटे फोडायचे हे राजकारण सर्वंच पक्ष करतात; परंतु कायम इतरांपेक्षा वेगळा पक्ष असल्याचा डांगोरा पिटणारा भाजपही त्याच वाटेवरून जातो, तेव्हा अपेक्षाभंग होतो. त्याचं दु:ख वेगळंच असतं. मोदी यांनी लोकसभेच्या निवडणुकीत दरवर्षी दोन कोटी लोकांना रोजगार देण्याचं आश्‍वासन दाखविलं होतं. कौशल्य विकास योजनेच्या माध्यमातून युवकांना प्रशिक्षित करण्याचं नियोजन होतं. खरं तर ही योजना संयुक्त पुरोगामी आघाडीच्या काळात तत्कालीन पंतपधान डॉ. मनमोहन सिंग यांनी जाहीर केली होती. ती जरी मोदी यांनी व्यवस्थित राबविली असती, तर ही वेळ आली नसती.
मोदी यांनी त्यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात मोठमोठ्या घोषणा केल्या. मेक इन इंडिया, स्टार्ट अप इंडियासारख्या घोषणा केल्या. देशात थेट परकीय गुंतवणुकीचं प्रमाण वाढलं असल्याचं जाहीर करण्यात आलं; परंतु प्रत्यक्षात त्याचे फायदे झालेले दिसत नाही. काँग्रेसच्या सरकारच्या काळात जेवढे रोजगार निर्माण होत होते, तेवढेही सध्या निर्माण होत नाहीत. एका आंतरराष्ट्रीय संस्थेच्या अहवालानुसार भारतात बेरोजगारीचा दर पूर्वी 3.3 टक्के होता, तो आता 4.8 टक्के झाला आहे. दोन कोटी रोजगार दरवर्षी देण्याचं राहिलं बाजूला. प्रत्यक्षात माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी एका भाषणात एक लाख तीस हजार जणांनाच रोजगार दिला गेला, अशी आकडेवारी दिली. नोटाबंदीमुळं तर 15 लाख संघटित लोकांचे रोजगार गेले. असंटित लोक किती बेरोजगार झाले, याचा पत्ताच नाही. अशा परिस्थितीत मोदी यांना गेल्या साडेतीन वर्षांत प्रथमच झालेल्या मुलाखतीत बेरोजगारीचा प्रश्‍न विचारणं स्वाभावीक होतं. तसा तो विचारला गेलाही. त्यांनी गेल्या वर्षी सत्तर लाख लोकांना रोजगार देण्यात आला असं सांगितलं. आता अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पुढच्या वर्षी सत्तर लाख लोकांना रोजगार देण्याचं आमिष दाखविलं आहे. लोकसभेची निवडणूक पुढच्या वर्षी असताना जेटली यांनी हे आश्‍वासन दिलं, हे महत्त्वाचं. मोदी यांनी रोजगार म्हणजे नोकर्‍या नव्हेत, असं सांगितलं. त्यासाठी एखाद्यानं भजी तळण्याचा व्यवसाय केला, तरी तो रोजगारच आहे, असं सांगितलं. मोदी यांचं हे उत्तर एकवेळ योग्य ठरवू; परंतु मग त्यात सरकारचं काय योगदान हा प्रश्‍न उरतोच. मोदी यांच्या याच भजीपुराणावरून आता वादंग माजलं आहे. विरोधकांच्या मोदी यांनी आयतं कोलित दिलं आहे. दुसरीकडं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी बेरोजगारीपेक्षा भजी तळणं केव्हाही चांगलं असं उत्तर काँग्रेसला दिलं असलं, तरी देशातील किती लोकांना शहा भजी तळायला लावणार आहेत. उच्च शिक्षण घेतलेल्यांनी कढया आणि झारे घेऊन बसायचं का, हा प्रश्‍न उरतोच.

रोजगार देण्यात अपयशी ठरलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचा निषेध करण्यासाठी औरंगाबादचे तरुण रस्त्यावर उतरले. रस्त्यावर चक्क भजी तळून या तरुणांनी मोदी यांचा निषेध केला. मी इंजिनियर आहे. मी एमबीए केलंय. मी बीएड पूर्ण केलं आहे, असे फलक हाती घेत काही तरुण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमले. त्यांच्या हातातील नो जॉब नो जॉब, पकोडा शॉप पकोडा शॉप हा फलक सर्वांचेच लक्ष वेधून घेत होता. वर्षाला दोन कोटी रोजगार देण्याचं स्वप्न मोदी यांनी तरुणांना दाखवलं होतं. मात्र, प्रत्यक्षात जेव्हा नोकरी देण्याची वेळ आली, तेव्हा मोदी पकोडा स्टॉल लावण्याचा सल्ला देतात. पकोडा स्टॉल लावणं हे काम करणं चुकीचं नाही. मात्र, विद्यार्थ्यांनी मोठया परिश्रमानं अभ्यास करून वडीलांचा आर्थिक ताण सहन करत पदवी मिळवली. त्यांची खिल्ली उडवण्याचं काम अशा वक्तव्यातून केलं जात असल्याची भावना या तरुणांनी व्यक्त केली. मोदी यांनी माफी मागावी किंवा माहिती तंत्रज्ञान कंपन्यांत रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यावी. तसंच सरकारी कार्यालयाच्या आवारात तरुणांना पकोडा स्टॉल लावण्याची परवानगी देणारा आदेश काढावा अशी मागणीही या बेरोजगार तरुणांनी केली. शहा यांनी भजी विकण्यात गैर काहीच नाही, असं सांगत मोदी यांच्या विधानाचं समर्थनही केलं. मोदी यांनी पकोडयाचा (भजी) ठेला सुरू करून बेरोजगारांनी रोजगार मिळवावा, असा सल्ला दिला होता. या विधानावरुन विरोधकांनी मोदींची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला. याचाही शहा यांनी समाचार घेतला. मोदींनी भजी विकून पैसे कमावण्याचा सल्ला दिला यावरुन काही लोकं टीका करतायंत; पण भजी विकणं ही लाजिरवाणी गोष्ट नाही. चहा विकणारा मुलगा देशाचा पंतप्रधान होऊ शकतो तर भजी विकणाराही मोठी व्यक्ती होऊ शकते. भविष्यात भजी विकणार्‍याची तिसरी पिढी या देशातील सर्वांत मोठे उद्योजकही असू शकतात, असं त्यांनी सांगितलं. भजी तळण्यात गैर काही नाही; पण मेहनतीने पैसे कमावणार्‍यांची तुलना भिकार्‍यांशी करणे गैर आहे, असं सांगत त्यांनी काँग्रेस खासदार पी. चिदंबरम यांना चिमटा काढला; परंतु त्यानं मूळ समस्येकडं दुर्लक्ष होत आहे, हे शहा यांना कोण सांगणार?