Breaking News

श्रमाला प्रतिष्ठा दिल्यास विकास निश्‍चित ः नरेंद्र घुले दहिगाव-ने घुले महाविद्यालयात राज्यस्तरीय चर्चासत्र उद्घाटन

संगणकीय युगात स्पर्धा वाढली असून विद्यार्थी जिवनात, शेतकरी, ग्रामीण उद्योगात व शहरी भागातही सर्वच क्षेत्रांत स्पर्धा असुन संगणक युगात नेट बँकींगचा स्वीकार करावाच लागणार आहे, स्वयंस्फूर्तीने सर्वगुणसंपन्न होण्यास सतत प्रयत्नशील राहिले पाहिजे, त्यासाठी कठोर परिश्रम घेण्याची तयारी ठेवा कारण श्रमाला प्रतिष्ठा दिल्यास विकास निश्‍चित होतो असे प्रतिपादन ज्ञानेश्‍वर उद्योग समूहाचे अध्यक्ष नरेंद्र घुले यांनी केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व दहिगाव ने येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात प्रथमच अर्थशास्त्र व वाणिज्य विषयावर दोन दिवसीय राज्यस्तरीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. त्याचे उद्घाटन घुले यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी आयोजित कार्यक्रमात आपल्या अध्यक्षीय भाषणात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. 


परिसराचे भाग्य विधाते स्व. मारुतरावजी घुले पाटील यांनी भविष्यातील गरज पाहून शिक्षण संस्थाची निर्मिती केली. त्याचा सर्वागीण फायदा आजच्या विद्यार्थ्यांना झाला असल्याचे मत आपल्या प्रास्ताविक भाषणात महाविद्यालयाचे प्रा. डॉ. डी. एन. वाबळे यांनी व्यक्त केले. अर्थशास्त्र अभ्यास मंडळ औरंगाबाद विद्यापीठ सदस्य प्रा. डॉ. अशोक कोरडे, न्यू आर्टस् महाविद्यालय अहमदनगर चे उपप्राचार्य प्रा. आर जी कोल्हे, डॉ. दीपक भुसारे, घुले शिक्षण संस्था समन्वयक प्रा. रामकिसन सासवडे, दहिगाव-ने कृषी विज्ञान केंद्राचे वरीष्ठ शास्त्रज्ञ शामकुमार कौशिक कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शेतीत बदल हा क्रमप्राप्त झाला असून पाण्याचे योग्य नियोजन केल्यास शाश्‍वत उत्पादन निघू शकते. कारण निसर्गावर आधारित शेतीत आपण हवामानात बदल करू शकत नाही, मात्र हवामानानुसार शेतीत बदल निश्‍चित करुन उत्पादन वाढवू शकतो असे मत दहिगाव-ने कृषी विज्ञान केंद्राचे वरीष्ठ शास्त्रज्ञ शामकुमार कौशिक यांनी यावेळी मार्गदर्शन करताना सांगितले. चर्चासत्रात पहिल्या दिवशी प्रा. दिपक भुसारे व प्रा. आर जी कोल्हे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी शोध निबंधावरील दोन ग्रंथाचे प्रकाशन अध्यक्षांच्या हस्ते करण्यात आले. सूत्रसंचालन प्रा. दिपक देवकर व प्रा. निलेश खरात यांनी केले तर आभार प्रा. अश्‍विनी देशमुख यांनी मानले.