Breaking News

सत्ता काळात शेतकर्‍यांबाबत निर्णय का घेतले नाही - कृषीमंत्री खोत

नुकतीच 47 लाख शेतक-यांना कर्ज माफी दिली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी यांनी सरकारने केलेल्या कर्ज माफीला लबाडाचे आमंत्रण असे संबोधले आहे. हल्लाबोल आंदोलन नसून डल्ला मारण्यासाठी आंदोलन आहे. परंतु गेल्या 50 वर्षापासून काँग्रेस राष्ट्रवादीकडे सत्ता असताना शेतक-यांबाबत निर्णय घेण्यासाठी तुमचे हात कोणी बांधले होते का? आज भाजपा सरकार शेतक-यांसाठी चांगले काम करीत असताना काँग्रेस-राष्ट्रवादी मगरीचे आश्रू काढत असल्याचे कृषीमंत्री ना. सदाभाऊ खोत यांनी स्पष्ट प्रतिक्रिया व्यक्त केली.

देवळाली प्रवरा महोत्सवानिमित्त आयोजित कृषी प्रदर्शनाला राज्याचे कृषिमंत्री ना. सदाभाऊ खोत यांनी भेट दिली असता पत्रकारांशी बोलताना सांगितले. यावेळी मा. आ. व शिर्डी संस्थांचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, नगराध्यक्ष सत्यजित कदम, प्रिती कदम, उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे, नगरसेवक सचिन ढूस, सागर खांदे, भारत शेटे, देवळाली प्रवरा सोसायटीचे चेअरमन शहाजी कदम, भगवान कदम, वसंत मुसमाडे, ज्ञानदेव खांदे, सचिन शेटे, अतुल कदम आदी उपस्थित होते. यावेळी सत्यजित मित्रमंडळाच्या वतीने त्यांना सन्मानचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले. त्याचबरोबर देवळाली प्रवरा सोसायटी, बागाईत पीक सोसायटी, शेतकरी संघटना आदींच्या वतीने देवळाली प्रवरा शहरात ना. खोत यांचे स्वागत करण्यात आले. 

यावेळी खोत म्हणाले की, देवळाली प्रवरा सारख्या छोटया शहरात शेतक-यांसाठी चांगले कृषीप्रदर्शन भरविण्यात आलेले आहे. या प्रदर्शनात नवनवीन तंत्रज्ञान उपलब्ध करण्यात आले आहे. हे प्रदर्शन नवयुवक शेतक-यांना उर्जा देण्याचे काम करील. भाजपा सरकार ग्रामीण भागातील शेतक-यांच्या गरजा पूर्ण करणारे सरकार आहे. शरद पवार हे मोठे व्यक्तिमत्व आहे. त्यांनी राजकारणातली अनेक उन्हाळे पावसाळे पाहिले आहे. त्यांच्यावर बोलणे उचित होणार नसल्याचे ते म्हणाले.


केंद्र सरकारने 50 लाख टन साखर बफर्स स्टॉक करण्याची परवानगी द्यावी. लोकशाही मध्ये आंदोलन करण्याचा सर्वाना अधिकार आहे. काँग्रेस राष्ट्रवादीने हल्लाबोल आंदोलन सुरु केले आहे. काँग्रेस राष्ट्रवादीला भाजपा सरकारने शेतक-यांचे प्रश्‍नच शिल्लक ठेवले नसल्याने त्यांना हल्लाबोल आंदोलन करावे लागत आहे. नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी कृषीप्रदर्शनासंदर्भात खोत यांना माहिती देताना सांगितले की, गेल्या वर्षापासून कृषीप्रदर्शन भरवण्यात येत आहे. यावर्षी चार एक्कर क्षेत्रात 175 स्टॉल उभारण्यात आले आहेत. शेतीपूरक साहित्य, औषधे, शैक्षणिक साहित्य, नवनवीन तंत्रज्ञान या प्रदर्शनात उपलब्ध झाले आहे. दोन दिवसाच्या कालावधीत अडीच लाख लोकांनी या प्रदर्शनास भेट दिली आहे. ग्रामीण भागातील शेतक-यांनी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन नगराध्यक्ष कदम यांनी केले आहे.