Breaking News

बँकांच्या व्हॅल्यूएटरमुळे बांधकाम व्यावसायिक हैराण विविध कर वाचविण्यासाठी पैशाची मागणी

सातारा,  :- राज्य आणि केंद्रातील सरकारे बदलल्यापासून नव्याने सत्तेत आलेल्या सरकारने केलेल्या कडक कायद्यांमुळे बांधकाम व्यावसायिक अडचणीत आले आहे. अशा स्थितीत प्रकल्पासाठी व्यावसायिकांनी कर्ज मागणी केल्यानंतर काही राष्ट्रीयकृत बँकांचे मुल्यांकन करणारे व्हॅल्युएटर संबंधित बांधकाम व्यावसायिक अथवा मालकांना विविध कर वाचवायचे असल्यास तात्काळ पैसे द्या, अन्यथा तुम्हाला विविध प्रकारचे कर भरावे लागतील, असे सांगून लोकांची लुटमार करत आहेत. दरम्यान, या व्हॅल्यूएटरबाबत एका राष्ट्रीयकृत बँकेच्या मुख्यालयाशी संपर्क साधला असता आमच्या काही व्हॅल्यूएटरला आम्ही मानधन तर काहींनी आम्ही नियमित पगार देत आहोत. त्यामुळे त्यांनी संबंधित बांधकाम करणार्‍या व्यक्तीला पैसे मागण्याचा कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले.


देशभरात सर्वत्र विकासगंगा वाहत रहावी यासाठी नवीन बदल आत्मसात करणे गरजेचे असते. त्यामध्ये रस्ते, पाणी, विज यासारख्या मुलभूत गरजांची सरकारने पुर्तता करण्याचा प्रयत्न केला आहे. त्या पायाभूत सुविधांचा वापर करण्यासाठी नागरिक स्वत:च्या विकासाची संकल्पनांना मुर्त रुप देण्याचा प्रयत्न करतात. हे करत असताना सरकारची धोरणे काही ठिकाणी नागरिकांचा फायदा करून देतात तर काही धोरणे नागरिकांचा तोटा करत असतात. त्याचाच एक भाग म्हणून बांधकाम व्यावसायिकांना रेरा अंतर्गत नोंदणी करणे बंधनकारक केले आहे. त्यानंतरच संबंधित बांधकाम व्यावसायिकास त्याच्या बांधकाम प्रकल्पास मंजूरी दिली जाते. मंजूर झालेला प्रकल्प अस्तित्वात येण्यासाठी परिसरात असलेल्या बँका अर्थसहाय्यक करत असतात. बांधकाम व्यावसायिकांने कोणत्याही बँकेकडे प्रकल्पासाठी कर्जाची मागणी केल्यानंतर बँक कागदपत्राची पुर्तता करुन घेतली जाते. त्यानंतर बँक संबंधित बांधकामाच्या प्रकल्पाच्या कार्यस्थळाची पाहणी करून त्याचे मुल्यांकन केले जाते. त्यामध्ये कर्ज परत फेड न झाल्यास बँक कशा प्रकारे दिलेल्या कर्जाची वसूली करता येईल. याचा बँकेच्या व्हॅल्यूएटरच्या माध्यमातून केले जाते. हे व्हॅल्युएटर काही बँकांनी मानधन तत्वावर तर काही बँकांनी रितसर पगाराने नेमणूक केली आहे. 

गेल्या काही दिवसापासून सातारा जिल्ह्यातील विविध प्रकल्पांना बँका पतपुरवठा करत आहेत. या प्रकल्पांना भेट देणारे अनेकजण आपण बँकेचे व्हॅल्यूएटर असल्याचे सांगून बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणास भेट देतात. नव्या सरकारने आकारण्यास सुरुवात केलेले विविध प्रकारचे कर वाचवायचे असल्यास तात्काळ पैसे द्या, असे सांगून बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणच्या लोकांमध्ये तसेच कधी-कधी संबंधित घराच्या मालकांना भीती दाखविण्याचे प्रकार होवू लागले आहेत. दरम्यान, एका राष्ट्रीयकृत बँकेच्या कर्ज वितरण करणार्‍या विभागाच्या अधिकार्‍याशी चर्चा केली असता व्हॅल्यूएटरना त्यांच्या कामाचे मानधन अथवा फी बँक देत असते. यासाठी व्हॅल्यूएटरना बांधकाम व्यावसायिक अथवा बांधकाम करणार्‍या मालकांनी पैसे देवू नये, असे आवाहन एका राष्ट्रीयकृत बँकेचे कर्ज विभागाच्या अधिकार्‍याने केले आहे.