Breaking News

वसईरोड स्थानकातील स्वयंचलित जिना बंद अवस्थेत

पालघर, दि. 21, फेब्रुवारी - पश्‍चिम रेल्वेच्या वसईरोड रेल्वे स्थानकातील स्वयंचलित जिना गेल्या काही दिवसांपासून बंद अवस्थेत असल्याने दैनंदिन प्रवाशांसह ज्येष्ठ नागरिक आणि महिलावर्गाची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. त्यामुळे गजबजलेल्या आणि महत्त्वपूर्ण मानल्या जाणा-या या स्थानकातील हा सरकता जिना त्वरित सुरु करावा अशी मागणी प्रवासी वर्गातून जोत धरत आहे. 


वसईरोड रेल्वे स्थानकातून दररोज दिवस रात्र हजारो प्रवासी नोकरी, शिक्षण आदी कारणास्तव प्रवास करीत असतात. मात्र स्थानकावर प्रवाशांना आवश्यक सोयीसुविधा पुरविण्यात रेल्वे प्रशासन असमर्थ ठरत असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होतं दिसत आहे. स्थानकावरील फलाट क्रमांक 2 वरील सरकता जिना बंद असल्याने प्रवाशांना त्याचा त्रास सहन क रावा लागत आहे. या सरकत्या जिण्याचे उद्घाटन गेल्याच वर्षी दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांच्या हस्ते करण्यात आले होते. उद्घातानंतरही हा सरकता जिना अधूनमधून बंद असायचा. मात्र आता तर या जिना पूर्णपणे बंद अवस्थेत असल्याने ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला, अपंग प्रवाशांना प्रचंड त्रास सोसावा लागत आहे. त्यांना ऐन गर्दीच्या वेळी धक्के खात जिन्यावरून प्रवास करावा लागत आहे. हा सरकता जिना बंद असल्याने रेल्वे प्रवाशांसह पूर्व-पश्‍चिम जाणार्‍या नागरिकांनाहि याचा बेहद त्रास होत आहे. यासंदर्भात रेल्वे प्रशासनाने गंभीरतेने पाऊल उचलून तत्काळ सरकत्या जिन्याची दुरुस्ती करून तो त्वरित सुरु करावा अशी मागणी प्रवासी वर्गातून करण्यात येत आहे.