Breaking News

भारत महासत्ता होण्यासाठी स्त्री शक्तीचेही योगदान- माजी आयुक्त उमाकांत दांगट

बीड (प्रतिनिधी)- मातेचा महिमा व शक्ती मोठी आहे.ती समाजाने ओळखावी. स्त्री शक्ती जागृत आहे.तिचे दर्शन समाजात पदोपदी होते. अंबाजोगाईत खर्या अर्थाने स्त्री शक्तीचा गौरव करण्याचे काम शिवजागर प्रतिष्ठाण व योगेश्‍वरी रोटरी क्लबच्या संयुक्त विद्यमाने शिवजन्मोत्सव व राजमाता जिजाऊ माँ साहेब पुरस्कार सोहळ्यातून झाले आहे. भारत महासत्ता होण्यासाठी स्त्री शक्तीचेही मोठे योगदान असल्याचे प्रतिपादन औरंगाबाद विभागाचे माजी आयुक्त उमाकांत दांगट यांनी केले. ते अंबाजोगाईत आदर्श राजमाता जिजाऊ माँसाहेब पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलत होते.

या पुरस्काराचे वितरण 19 फेब्रुवारी सोमवार रोजी सायंकाळी 4 वाजता नगरपरिषदेच्या आद्यकवी मुकुंदराज सांस्कृतिक सभागृहात झालेे.शिवजागर प्रतिष्ठाणच्या वतीने गेल्या 15 वर्षापासुन राजमाता जिजाऊ यांच्या प्रेरणेने कष्टातून,संघर्षातून कुटुंबाची व मुला-मुलींची जडण-घडण करणार्या आदर्श मातांचा शोध घेवून त्यांची पुरस्कारासाठी निवड के ली जाते पुरस्काराचे हे 16 वे वर्ष आहे.यावर्षी शिवजागर प्रतिष्ठाण व योगेश्‍वरी रोटरी क्लबच्या संयुक्त विद्यमाने शिवजन्मोत्सव व राजमाता जिजाऊ माँ साहेब पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.यावर्षी आदर्श माता जिजाऊ माँसाहेब पुरस्कार सौ.उषा दगडूसाहेब चव्हाण,सौ.संगीता दत्तात्रय भस्मे, सौ.संगीता नवनाथ होके,सौ.सुजाता दिलीप पाटील,सौ.भारती दत्तात्रय गिरी, सौ.अलका विक्रम अंधारे,सौ.अनिता जगन्नाथ सरवदे, सौ.अर्चना खंडेराव पांचाळ या आठ मातांना शाल,श्रीफळ,साडी-चोळी व सन्मानपत्र देवून मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करून प्रदान करण्यात आला. यावेळी राजेसाहेब देशमुख (शिक्षण व आरोग्य सभापती जि.प.बीड) यांना कै.नागोराव काशिनाथराव लोमटे (नवाब) स्मृती पुरस्कार 2018 ने सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आयुक्त उमाकांत दांगट तर प्रमुख पाहुणे म्हणून मा.पृथ्वीराज साठे (माजी आमदार केज विधानसभा मतदार संघ),राजकिशोर मोदी (जिल्हाध्यक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस.बीड), राजेसाहेब देशमुख (शिक्षण व आरोग्य सभापती जि.प.बीड), नवनाथराव घाडगे (कार्याध्यक्ष म्युन्सिपल इंजिनिअर्स असोसीएशन मुंबई), हणमंतराव मोरे (व्हाईस चेअरमन अंबाजोगाई सहकारी साखर कारखाना), सौ.मिनाताई शिवहार भताने (सभापती पंचायत समिती अंबाजोगाई), बबनभैय्या लोमटे (सभापती पाणी पुरवठा न.प.अंबाजोगाई) आणि हे मान्यवर तसेच शिवजागर प्रतिष्ठाणचे अध्यक्ष अमृतराव टेकाळे व योगेश्‍वरी रोटरीचे अध्यक्ष श्रीरंग चौधरी यांची विचारमंचावर प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून दिपप्रज्वलन करण्यात आले.
त्यानंतर दिवंगत माजी नगराध्यक्ष बालासाहेब लोमटे (नवाब) यांना सभागृहाने भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण केली. या प्रसंगी बोलताना माजी आयुक्त उमाकांत दांगट यांनी अंबाजोगाईचे महत्व विषद केले.तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य सभागृहासमोर ठेवले यशाकडे जाण्यासाठी अनेक रस्ते असतात परंतु,एक रस्ता निवडून त्याच्यावर दमदार पाऊले टाकत चालले पाहिजे चालताना मागे ओळून पाहू नका असा मौलीक विचार दांगट यांनी यावेळी मांडला. तर माजी आ.पृथ्वीराज साठे यांनी या उपक्रमाचे कौतुक करून जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी अंबाजोगाईत होत असलेला हा उपक्रम आगळा-वेगळा असल्याचे सांगुन जिजाऊंची प्रेरणा घेवून काम करणार्या मातांचा सन्मान होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. सभापती राजेसाहेब देशमुख यांनी सत्काराला उत्तर देताना ज्या नागोराव पापा लोमटे मुळे मी घडलो त्यांच्याच नावाचा पुरस्कार मिळाल्याने आपण भाग्यवान असल्याचे सांगुन त्यांनी शिक्षण क्षेत्रात जिल्ह्यात चांगले काम सुरू असल्याचे नमुद केले.याप्रसंगी पालिकेचे पाणी पुरवठा सभापती बबनभैय्या लोमटे, नवनाथराव घाडगे, पंचायत समितीच्या सभापती मिनाताई भताने यांचीही समायोचित भाषणे झाली.पुरस्कार प्राप्त आदर्श मातांच्या वतीने लातूर येथील गटशिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांनी प्रातिनिधीक मनोगत व्यक्त केले.प्रारंभी प्रास्ताविक करताना अमृतराव टेकाळे यांनी मराठवाडा जरी कायम दुष्काळी असला तरी या भागातले लोक हे अत्यंत कष्टाळू आहेत. मुलांना उच्च विद्याविभूषीत करतात. कुटुंबासाठी व मुलांसाठी राबणार्या आईचा सन्मान करणारा हा उपक्रम गेली 15 वर्ष सुरू आहे.