Breaking News

2019 मध्ये नरेंद्र मोदी चुना लावून जातील, मग कोणाकडे दाद मागायची? रविकांत तुपकर यांचा सवाल

सातारा, दि. 20 (प्रतिनिधी) : विजय मल्ल्या, ललित मोदी, नीरव मोदी, रोटोमॅकचा विक्रम कोठारी देशाला हजारो कोटींचा चुना लावून पळाले. हे लोक पंतप्रधान मोदींच्याच जवळचे असून केंद्राच्या आशिर्वादाशिवाय पळून जावू शकत नाहीत. 2019 मध्ये नरेंद्र मोदी चुना लावून जातील, मग आम्ही कोणाकडे दाद मागायची? असा खडा सवाल वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी आज येथे केला.


येथील शासकीय विश्रामगृहात बोलावलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. केंद्र व राज्य सरकारची प्रत्येक घोषणा हेडलाईन मॅनेजमेंटचा भाग असल्याचा हल्ला तुपकर यांनी यावेळी चढवला. केवळ भुलभुलैय्या करायचा, मोठी स्वपे दाखवायची, 2022 ची भाषा करायची. तुम्ही 2019 नंतर येणार आहात काय अशी खिल्ली त्यांनी उडवली.

राज्यातील व केंद्रातील सरकार उद्योगपतींच्या पाठीशी आहे. हजारो कोटींचा चुना लावून जाणारांचे तुम्ही काय वाकडे केले? तांदुळ टाटा-बिर्लाच्या कारखान्यात पिकत नाही हे लक्षात ठेवा. यांना केवळ शिवछत्रपतींच्या नावावर मते हवी आहेत. मागील निवडणुकीत यांनी ’शिवछत्रपतींचा आशिर्वाद’ जाहिरात केली. आता आम्ही ’शिवछत्रपतींचा आ शिर्वाद, चला घालू भाजपच्या पेकाटात लाथ’ असा नारा देणार आहोत, असे त्यांनी सांगितले.
आमच्या कुंडल्या काढायची भाषा करू नका, असे बजावून, मोहन भागवत सैन्यदलाचा अवमान करणारे वक्तव्य करतात, अनंतकुमार हेगडे यांच्यासारखे सहाव्यांदा खासदार झालेले लोकप्रतिनिधी संविधान बदलण्यासाठीच सत्तेवर आलो आहोत, असे म्हणतात. यांना म्हातारपणी लेकरू झाले आहे. सत्ता हे याच्यासाठी नवसाचे पोर आहे. त्यामुळे कसे वागावे, काय बोलावे यांना कळत नाही. यांचे लग्न एकाशी आणि लफडे दुसर्‍याशी असते, असा टोला त्यांनी लगावला. 

छत्रपती शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणार्‍या श्रीपाद छिंदमविषयी छेडले असता, तो संघाचा असून त्याच्या पोटातील ओठात आले आहे, अशी प्रतिक्रिया तुपकर यांनी दिली. भाजपच्या नेत्यांनी यासंदर्भात अद्यापही खुलासा केलेला नाही यातून सर्व स्पष्ट होते. तमाम शिवभक्तांच्या भावना भाजपने दुखावल्या आहेत, असेही ते म्हणाले.