Breaking News

उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईने कोयना पोलिसांच्या कामावर प्रश्‍नचिन्ह

सातारा, : कोकणातून पाटण तालुक्यात येणारी गावठी दारू उत्पादन शुल्क विभागाने कोयना विभागातील ढाणकल गावाजवळ पकडल्यानंतर कोयनानगर पोलिसांच्या कार्यपध्दतीबाबत उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे. अवैध धंद्यांवर कारवाईचा आव आणणार्‍या कोयनानगर पोलिसांची या कारवाईमुळे चांगलीच पंचाईत झाली आहे. या कारवाईतून धडा घेवून यापुढे तरी कोयना विभागातील अवैध धंद्यांवर कोयनानगर पोलीस अंकुश ठेवण्याचा प्रयत्न करणार का? असा प्रश्‍न जनता विचारू लागली आहे. 

राज्य उत्पादन शुल्क व दारूबंदी विभागाच्या पथकाने मागील आठवड्यात कोकणातून पाटण तालुक्यात येत असलेली 200 लिटर दारू पकडून तिघांना अटक केली होती. या कारवाईने गावठी दारूची कोयनानगरसह पाटण तालुक्यात होत असलेली विक्रीचा पर्दाफाश करण्यात उत्पादन शुल्क विभागाला यश आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कोयनानगर विभागात गावठी दारूचा महापूर येत असल्याचे बोलले जात होते. या पार्श्‍वभूमीवर कोयनानगर पोलिसांकडून देशी-विदेशी दारू विक्री करणार्‍या युवकावर काही दिवसांपूर्वी केलेली कारवाई ही डोंगर पोखरून उंदीर बाहेर काढल्यासारखी आहे. अशाच प्रकारच्या कारवाया करून विभागातील अवैध धंद्यांवर अंकुश ठेवल्याचा दावा केला जात असल्याचे जनतेतून बोलले जात आहे..
कोयना विभागात गोवारे परिसरात ताज्या घटनेत दारू पिणार्‍यावर कारवाई तर दारू गुत्ताचालकाला अभय मिळाल्याची चर्चा रंगली होती. गत तीन महिन्यात अवैध धंदे करणार्‍यांना कोयना पोलिसांकडून तडीपार करण्यात आले होते. मात्र तरीही कारवाईत सातत्य रहात नसल्याने अनेक ठिकाणी अवैध धंदे जोमात सुरू असल्याचा प्रत्यय जनतेला येत आहे. उत्पादन शुल्क व दारूबंदी विभागाच्या कारवाईनंतर तरी कोयनानगर पोलिसांकडून अवैध धंद्यांवर अंकुश ठेवणार का? असा प्रश्‍न जनतेतून उपस्थित झाला आहे..
कोयना विभागातील अनेक ठिकाणी अवैध दारू गुत्त्यावर देशी दारू मिळते. मात्र, देशीच्या तुलनेत कोकणातून येणारी गावठी दारू स्वस्त आहे. अगदी पाच रूपयांपासून पुढे तिची किरकोळ विक्री होत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे अनेकजण गावठीच्या आहारी गेले आहेत. दारूच्या गुत्त्यावरही ’देशी हवी की गावठी’ अशी विक्रेत्यांकडून विचारणा केली जाते. देशी बाटलीचा दर अनेकांच्या खिशाला न परवडणारा असल्याने दुष्परिणामांकडे दुर्लक्ष करून गावठीला मद्यपीं जास्त पसंती देत आहेत. याच कारणामुळे कोकणातून गावठी दारू मागविण्यात येत आहे.