होळी
होळी हा संपूर्ण भारतामध्ये विशेषत: उत्तर भारतामध्ये अतिशय उत्साहाने साजरा होणारा सण आहे. या सणाला "होळी पौर्णिमा" असेही संबोधले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची स्थाननिहाय विभागणी होते तर काही ठिकाणी एकत्रितरीत्या तो साजरा होतो.
फाल्गुनी पौर्णिमा या दिवसापासून पंचमीपयर्त या ५-६ दिवसांत कुठे दोन दिवस तर कुठे पाचदिवस हा उत्सव साजरा केला जातो. भारतातल्या वेगवेगळ्या भागांत फाल्गुन पौर्णिमेला एक लोकोत्सव मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा होतो. ह्या उत्सवाला "होलिकादहन" किंवा "होळी", "शिमगा", "हुताशनी महोत्सव", "दोलायात्रा", "कामदहन" अशा वेगवेगळ्या संज्ञा आहेत.
कोकणात शिग्मो किंवा शिग्मा म्हणतात. फाल्गुन महिन्याच्या शेवटच्या दिवशी साजरा होणाऱ्या ह्या लोकोत्सवाला "फाल्गुनोत्सव", आणि दुसऱ्या दिवशी सुरू होणाऱ्या वसंत ऋतूच्या आगमनानिमित्त "वसंतागमनोत्सव" किंवा "वसंतोत्सव" असेही म्हणण्यात येते.देशीनाममाला या ग्रंथात हेमचंद्र याने याला सुग्री ष्मक असे नाव दिले आहे.
यातूनच ‘शिमगा’ असा अपभ्रंश तयार झाला असावा. महाराष्ट्रात होळीच्या दिवशी समिधा म्हणून काही लाकडे मंत्रोच्चारात जाळण्यात येतात, आणि पेटलेल्या होळीभोवती 'बोंबा' मारत लोक प्रदक्षिणा घालतात. होळी नंतर ५ दिवसांनी रंगपंचमी हा सण साजरा केला जातो
