Breaking News

मेट्रो पहिल्या टप्प्यात निगडीपर्यंत नेणारच : लांडगे


विविध संघटनांच्या वतीने करण्यात आलेल्या लाक्षणिक उपोषणाला आमदार महेश लांडगे यांचा पाठिंबा
पिंपरी : पुणे मेट्रो पहिल्याच टप्प्यात निगडीपर्यंत धावणार आहे. त्यासाठी सर्व स्तरांवर प्रयत्न करण्यात येणार आहेत. सध्या मेट्रो पिंपरी पर्यंत येणार असून पुढील मार्ग वाढविण्यासाठी येत असलेल्या नेमक्या अडचणी जाणून त्यावर उपाय काढून पिंपरी ते निगडी पर्यंतच्या मेट्रो कामाला हिरवा कंदील लवकरच दाखवण्यात येईल, असे मत भोसरी विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केले.

पिंपरी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये विविध सामाजिक संघटनांच्या वतीने पुणे मेट्रो पहिल्या टप्प्यात निगडीपर्यंत जावी, या मागणीसाठी लाक्षणिक उपोषण करण्यात आले. या उपोषणाला आमदार महेश लांडगे यांनी पाठिंबा दिला, उपोषणकर्त्यांशी चर्चा करताना ते बोलत होते. यावेळी विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आमदार महेश लांडगे म्हणाले की, बजेट सत्रामध्ये पहिल्या टप्प्यात मेट्रोमार्ग लांबवण्याचा मुद्दा मांडणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून पिंपरी ते निगडी व नाशिक फाटा ते चाकण या वाढीव मेट्रो मार्गाचा डीपीआर तयार करण्यास मेट्रोला सांगितले आहे. जून, 2018 पर्यंत हे डीपीआर चे काम पूर्ण होईल. पिंपरी ते निगडी आणि नाशिक फाटा ते चाकण या मार्गावर मेट्रो पहिल्या टप्प्यात होणे गरजेचे असून त्याचा पाठपुरावा करणार आहे. वाढीव मार्गासाठी वाढीव निधीची आवश्यकता भासणार आहे. त्यासाठी शहरातील मोठ्या उद्योगांकडे त्यांच्या सीएसआर मधून निधी उभा करण्यासाठी देखील प्रयत्न करण्यात येणार आहेत.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड ही दोन शहरे एकमेकांसाठी पूरक आहेत. त्यामुळे पुण्याप्रमाणेच पिंपरी-चिंचवड शहराला देखील न्याय मिळायला हवा. पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे काम वेगाने सुरु आहे. यामध्ये पिंपरी ते निगडी या मार्गाचे देखील काम झाले तर ते नागरिकांसाठी फायद्याचे ठरेल. पहिल्या टप्प्यात पिंपरी ते निगडी या मार्गावर मेट्रो सुरु झाली तर पिंपरी-चिंचवड शहरातील सुमारे एक तृतीयांश नागरिकांना त्याचा लाभ घेता येईल. मेट्रोमुळे शहराच्या सुंदरतेत भर पडणार आहे. तसेच नागरिकांचा वेळ वाचणार आहे. प्रदूषणावर मोठ्या प्रमाणात आळा बसेल तसेच वाहतुकीच्या कोंडमारीतून नागरिकांना सुटका मिळेल. मेट्रोचे थांबे दर किलोमीटरवर असल्याने फार कमी वेळेत नागरिकांना इच्छित स्थळी पोहोचता येईल. त्यामुळे पहिल्याच टप्प्यात निगडीपर्यंत मेट्रो होणे गरजेचे आहे. मेट्रो निगडीपर्यंत नेण्यासाठी सर्व स्तरांवर पाठपुरावा करणार आहे. हे केवळ आश्‍वासन नसून याबाबत ठोस पावले उचलली जाणार आहेत, असेही ते म्हणाले.
निगडीपर्यंत मेट्रो व्हावी हा राजकीय मुद्दा नाही. ही नागरिकांची मागणी आहे. नागरिकांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करणे हे प्रत्येक लोकप्रतिनिधी तसेच प्रशासनाचे प्रथम कर्तव्य आहे. मेट्रो केवळ पिंपरी पर्यंत आल्यास शहरातील लोकसंख्येचा मोठा भाग या सेवेपासून वंचित राहणार आहे. त्यामुळे मेट्रो पहिल्या टप्प्यात निगडीपर्यंत धावेल, असा ठाम विश्‍वास देखील आमदार महेश लांडगे यांनी यावेळी व्यक्त केला. मेट्रोच्या मागणीसाठी नागरिकांना पुन्हा रस्त्यावर येण्याची वेळ येऊ देणार नाही
पुणे मेट्रो पहिल्या टप्प्यातच निगडीपर्यंत व्हावी. अशी मागणी जनतेतून होत आहे. नागरिकांची ही गरज असून याचे फायदे देखील नागरिकांना मोठ्या प्रमाणात मिळणार आहेत. त्यामुळे नागरिक विविध संघटनांच्या माध्यमातून वेळोवेळी सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करीत आहेत. रविवारी रोजी विविध संघटनांच्या माध्यमातून करण्यात आलेले लाक्षणिक उपोषण हे अखेरचे उपोषण असेल, यानंतर नागरिकांना मेट्रो निगडीपर्यंत होण्याच्या मागणीसाठी रस्त्यावर यावे लागणार नाही. पुणे मेट्रो पहिल्याच टप्प्यात निगडीपर्यंत धावेल, असे आमदार महेश लांडगे म्हणाले.